गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) marigold farming story : पारंपारिक पिकावर अवलंबून न राहता फुलशेतीची लागवड केल्यास फायदा होऊ शकतो. त्यात सणांच्या काळात फुलाला विशेष मागणी असते. अशा वेळी फुल शेतीतून चांगला नफा होऊ शकतो. शेतकरीही याकाळात झेंडू फुलांचे मोठं उत्पन्न घेतात. कधी चांगला भाव तर कधी मातीमोल भावानं या फुलांची विक्री होते. पण केवळ दसऱ्यात नव्हे तर इतर वेळीही झेंडूची शेती लाखोंचे उत्पन्न देणारी ठरू शकते. याचंच उदाहरण असलेल्या प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा आपण पाहणार आहोत. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील ममदापुर येथील अल्पभूधारक शेतकरी भाऊसाहेब निकम व त्यांच्या कुटूंबियांनी आपल्या एक एकर शेडनेटमध्ये ३० गुंठे जागेवर ठिबक सिंचनाचा अवलंब करत झेंडूच्या फुलांची चार हजार रोपांची लागवड केली आहे.
मागील काही दिवसापासून त्यांची झेंडूची फुले निघण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ३७ क्विंटल उत्पन्न मिळाले असून बाजारपेठेत चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो प्रमाणे भाव मिळत आहे. शेडनेटमध्ये झेंडूचे उत्पादन घेतल्याने फुलाची गुणवत्ता अधिक चांगली असल्याने फुलांना मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. इतर झेंडू फुलाच्या तुलनेत अधीकचा दर मिळत असल्याचे असं शेतकरी भाऊसाहेब निकम यांनी सांगितलंय.
लागवडीनंतर ४० ते ५० दिवसात उत्पादन सुरू : एक एकर शेडनेटमध्ये ३० गुंठ्यात एका सीड्स कंपनीचे १६९२ या पिवळ्या रंगाच्या वाणाची लागवड १ ऑगस्ट रोजी पाच फुटाचे बेड पाडून पाच बाय दोनवर चार हजार रोपांची लागवड केली. लागवड केल्यानंतर ४५ ते ५० दिवसानंतर फुलांचे उत्पन्न सुरू झाले. शेतकरी भाऊसाहेब निकम हे आपल्या कुटूंबियासोबत दिवसभर फुलांची तोडणी करून पहाटे चार वाजता आपल्या गाडीने फुलं विक्रीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील गुलमंडी येथे नेत असतात. तेथे त्यांना प्रति किलोला ४० ते ५० रुपये दर मिळतो. आतापर्यंत फुलांच्या तीन तोडणीतून त्यांना ३७ क्विंटल उत्पादन मिळाले आहे. पाच ते सहा महिने उत्पन्न मिळणार असून तीस गुंठ्यात त्यांना ७५ ते ८० क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे.
शेडनेटमधील झेंडूची गुणवत्ता अधिक चांगली : शेडनेटमध्ये झेंडूचे उत्पन्न घेतल्यानं बाहेरील वातावरणाचा या रोपावर कमी परिणाम होत असून झेंडूला फवारणी कमी लागते. रोपे रोगाला बळी पडत नाही. त्यामुळे फुलांची गुणवत्ता अधिक चांगली असते. तीस गुंठ्यासाठी खत, बियाणे असा एकूण ३० हजार रुपयांचा खर्च आला आहे. त्यापासून ७० ते ७५ क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे. सरासरी ४० ते ५० रुपये प्रति किलो भाव मिळाल्यास खर्च वजा जाता पाच महिन्यात तीन लाख रुपयेपर्यंत नफ्याची आशा आहे. त्यामुळे झेंडूची सोनेरी शेती त्यांना लाखमोलाची ठरते आहे, असंही ते म्हणाले.
हेही वाचा -
- Koyna Dam : शेती आणि उद्योग क्षेत्राासाठी आनंदाची बातमी...कोयना धरणात प्रतिसेकंद 9 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू
- Thane News: मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याने हायवेवर सुरू केली शेती, आत्मदहनाचा इशारा
- MS Dhoni Driving Tractor : एमएस धोनीचा ट्रॅक्टरवर बसून शेती करतानाचा लूक; कॅप्शनसह व्हिडीओ इन्स्टावर केला पोस्ट