औरंगाबाद: मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणुकीत 61 हजार 529 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ज्यामधे औरंगाबाद - 13924, जालना - 5037, परभणी - 4472, हिंगोली - 3060, नांदेड - 8821, बीड - 9769, लातूर - 11264, उस्मानाबाद - 5182 असे मतदार आहेत. त्यात महिला मतदार 14749 तर पुरुष मतदार 46780 इतके आहेत.
जुनी पेन्शन योजना प्रचाराचा मुद्दा : शिक्षकांच्या अनेक मागण्या असून त्यासाठी शिक्षक संघटनांनी वेळोवेळी आंदोलन केली. त्यात राजकीय पक्षांनी गरजेनुसार सहभाग नोंदवला असे असले तरी, या निवडणुकीत जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा हाती घेऊन, सर्वच पक्षांनी निवडणूक प्रचार केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शन सुरू करणे शक्य नाही असे सांगितले होते. त्यालाच प्रचाराचा मुख्य आधार घेत राष्ट्रवादीसह इतर उमेदवारांनी आमच्या शिवाय पेन्शन योजना लागू करू शकणार नाही.असा दावा करत मतदान मागितले.
सर्व उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क : मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत आठ जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. 14 उमेदवार आपले नशीब आजमावत असून सर्वांनी आपापल्या मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे उमेदवार किरण पाटील यांनी सकाळी औरंगाबादच्या पंचायत समिती कार्यालयात आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी वातावरण चांगला असून आपलाच विजय निश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विजयाचा शंभर टक्के विश्वास: राष्ट्रवादीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार विक्रम काळे यांनी लातूरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. सतत शिक्षकांचे प्रश्न मांडले. यापुढेही त्यांच्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन विक्रम काळे यांनी दिले. शिक्षक मुख्याध्यापक आणि संस्थाचालक संघटनेचे मनोज पाटील यांनी शासकीय आयटीआय कॉलेज औरंगाबाद येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. राजकीय पक्षांनी शिक्षकांच्या हक्काच्या मतदारसंघात अतिक्रमण केले. शिक्षकांच्या मागण्यांचे त्यांना काहीही देणे घेणे नाही. त्यामुळेच शिक्षक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून कोणताच राजकीय पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या विचाराचा नाही. मात्र शिक्षक संघटना म्हणून त्याच्यासाठी कायम आंदोलन केले आणि यापुढेही आम्ही ती मागणी पूर्ण करू, मला विजयाचा शंभर टक्के विश्वास आहे असे मनोज पाटील यांनी मतदान केल्यावर सांगितले.