औरंगाबाद - राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असली, तरी मराठवाडा अद्याप पावसाची वाट पाहत आहे. आजपर्यंत सरासरीच्या अवघे 68 टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे वरुणराजा कधी मेहेरबान होईल याची प्रतीक्षा शेतकऱ्यांसह नागरिक करत आहेत.
'सर्वाधिक पाऊस जालना जिल्ह्यात'
मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांचा विचार केला, तर वार्षिक सरासरीच्या 68 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा सरासरी इतका पाऊस तरी पडेल का? असा प्रश्न पडला आहे. आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पाहता जालना जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 78 टक्के इतका पाऊस झाला आहे. नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये 75 टक्के पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात 70 टक्के, बीड जिल्ह्यात 69 टक्के, लातूर 61 टक्के तर औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये 57 टक्के इतका सर्वात कमी पाऊस झाला असल्याची अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.
'यंदा मिळत आहे तालुका निहाय माहिती'
यंदा ऑटोमॅटिक वेदर स्टेशनद्वारे पावसाची सरासरी घेतली जात आहे. त्यामुळे मंडळनिहाय पावसाची आकडेवारी देण्याऐवजी तालुकानिहाय आकडेवारी संकलित करण्याचे काम होत आहे. त्यात सरासरी झालेला पाऊस आणि टक्केवारी इतकी माहिती प्रशासनासमोर येत आहे. तसेच, विभागातील काही जिल्ह्यातील वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी देखील कमी करण्यात आली आहे. औरंगाबाद 675 वरून 581 मि.मी अशी वार्षिक सरासरी आता गृहीत धारण्यात आली आहे.
'शेतीबाबत काळजी घेण्याचा सल्ला'
खरिपाची पेरणी झाली आहे. त्यात प्रामुख्याने कापूस, मका, तूर या पिकांचा समावेश आहे. मराठवाड्यात सरासरी पाऊस झाल्याने पिकांची अवस्था चांगली असली, तरी कापूस आणि मका यांमध्ये आळी पडण्याचा धोका आहे. असा धोका आढळून आल्यास तातडीने लिंबोळीची फवारणी करावी. असा सल्ला जिल्हा कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी दिला आहे. पिकांची अवस्था चांगली असली, तरी जमिनीतील पाणी वाढीसाठी पावसाची गरज असून, उरलेल्या काही दिवसांमध्ये पाऊस पडण्याची आशा आहे. असे मत डॉ. मोटे यांनी व्यक्त केले आहे.