औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान देणाऱ्या युवकांच्या कुटुंबियांना मदत करा, या मागणीसाठी मराठा क्रांतीमोर्चाच्या वतीने शहरातील क्रांतिचौक भागात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात येत आहे. याबाबतचा आढावा घेतला आहे ई टीव्ही भारतचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी..
30 जुलैला मुंबईत मराठा क्रांतीमोर्चाच्या समन्वयकांची राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत कुठलाही मार्ग निघाला नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चातर्फे 8 ऑगस्ट पासून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार औरंगाबादच्या क्रांतिचौक भागातून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
पहिल्या दिवशी ठिय्या आंदोलन, दुसऱ्या दिवशी जागरण गोंधळ आंदोलन तर तिसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन करत सरकारचा निषेध आंदोलकांनी केला.
जुलै 2018 मध्ये कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे या आंदोलकाने जलसमाधी घेतल्याने आंदोलनाचा पहिला बळी गेला होता. त्यानंतर राज्यभरात जवळपास 42 जणांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केल्या होत्या. त्यावेळी आत्महत्या केलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले होते. मात्र त्यानंतर कोणालाही मदत प्रत्यक्षात मिळाली नसल्याने 23 जुलै 2020ला कायगाव टोका येथे आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी सरकारने काकासाहेब शिंदेंच्या कुटुंबातील व्यक्तींना मदत करण्या बाबत त्या बैठकीत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याबैठकीत तोडगा निघाला नसल्याने मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाला सुरुवात केली. राज्य सरकार आमचे फसवणूक करत असल्याचा आरोप करत आज अर्धनग्न आणि बोंबा मारो आंदोलन पुकारले.