छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange On OBC : मराठा नेत्यांमुळे आमचं आम्हाला मिळालं नाही. आमच्या मुलांचं नुकसान झालं. आम्ही ओबीसीमध्ये असूनही ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे न्याय मिळाला नाही. आता सर्वत्र पुरावे सापडत आहेत. त्यामुळे गावा-गावातला ओबीसी समाजदेखील आमच्यासोबत आहे. नेते आपल्यात भांडणं लावत असल्याचं त्यांनाही माहिती आहे. आरक्षण नसल्यानं गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळत नाही. पुरावे नसल्यानं विरोध झाला असता, तर तो मान्य होता, असं मत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगरात व्यक्त केलं.
गृहमंत्र्यांनी आरक्षण घेऊन यावं : गृहमंत्री छत्रपती संभाजीनगर शहरात येणार आहेत, त्यांनी येताना आरक्षण घेऊन यावं. मी त्यांच्या गळ्यात पडेल. कोणी येवो अथवा न येवो आम्हाला आरक्षण पाहिजे. सरकारकडून येणारं शिष्टमंडळ आता उद्या येणार आहे. ते येणार का नाही, हे नंतर बघू. मात्र सरकारच्या वतीनं आरक्षण देण्याबाबत जोरदार तयारी सुरू आहे, असंही मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितलं. प्रत्येक जिल्ह्यात कक्ष उभारले आहेत. त्यामुळे आता दिरंगाई करणार नाही, असं वाटत आहे. जर दिरंगाई केलीच तर यावेळी आम्ही सावध आहोत, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.
यंदा करणार नाही दिवाळी साजरी : माझा दौरा दिवाळीनंतर सुरू होईल. मात्र तो कसा होईल, ते नंतर सांगेल, असं मनोज जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केलं. आरक्षण मिळेपर्यंत फटाके फोडणार नाही. आमच्या भावंडांनी आत्महत्या केल्या असताना लाडू करंजी खाणं योग्य नाही. आजच्या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या युवकांना तातडीनं मदत करुन सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.
ओबीसी बांधव विरोध करत नाही : बिहारमध्ये आरक्षणाचा टक्का वाढवण्याचा निर्णय सरकार घेत आहे. इकडं पण आधी आम्हाला ओबीसीमध्ये समाविष्ट करावं आणि मग काय वाढवायचं ते वाढवा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. आम्ही कोणाचं ओढून घेत नाही, आमचं जे तिथं आहे ते घेणार आहोत. ते सत्य असल्यानं सरकार आम्हाला देऊ लागलं आहे. आमच्याकडं पुरावे आहेत. गावागावात ओबीसी बांधवांना ते पटत असल्यानं तेदेखील विरोध करत नाहीत. ओबीसी नेते भांडण लावत आहेत, हे लोकांना माहीत झालं आहे. आमच्याकडं पुरावे सापडले, म्हणजे आम्ही ओबीसीच होतो हे आता सर्वांना माहीत झालं आहे. त्यामुळेच आता विरोध होत नाही, असं मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा :