गंगापूर (औरंगाबाद) - गंगापूर तालुक्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने तालुका जलमय झाला आहे. तालुक्यातील शिवना नदीला महापुर आला असुन शिवना काठावरील शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शिवना, नारळी, होळी, नागझरी, खाम, लेंडी नद्यांना पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असुन ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहे. शिवना नदीला आलेल्या पुराने मालुंजा पुलावरून पाणी वाहत असल्याने गंगापूर लासुर मार्ग बंद करण्यात आला होता. जोरदार झालेल्या पावसाने शेताला तळ्याचे स्वरूप आले असुन काढणीला आलेले कापुस, सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
होळी नदीचा केटीवेअर फुटल्यामुळे मोठे नुकसान
तालुक्यातील माळीवाडगाव परिसरात असलेल्या होळी नदीवरील केटीवेअर फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने कापुस, मका, तंबाटे वाहुन गेल्याने मोठे नुकसान झाले. पाण्याच्या प्रवाहाने जमीन खरडून गेली आहे. माळीवाडगाव येथील होळी नदी काठवर असलेल्या गट क्रमांक 179, 180 मधील शेतकऱ्यांचे केटीवेअर फुटल्याने शेतात पाणी शिरल्याने जमीन खरडून गेली आहे. शेतातील पिके वाहून गेल्याने सोमनाथ वाघचौरे, साईनाथ वाकचौरे, राजू वाकचौरे, कैलास दुशिंग आदी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पुरात अडकलेल्या १२ नागरिकांची रात्री सुटका
शिवना नदीला आलेल्या पुरामुळे नदीलगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. कोबापुर शिवारातील तरडे वस्तीला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने तीन कुटुंबातील १२ सदस्य अडकून पडले होते. त्यात दोन लहान बालकेही होते. घरात पाणी शिरल्याने कुटुंबातील सदस्य घराच्या छतावर बसल्याचे पाहयला मिळाले. याबाबत माहिती कळताच नगरपालिकेचे सुनील खाजेकर, बोटचालक दीपक वाडे, तलाठी शिरसागर, उपसभापती सुमित मुंदडा, अतुल रासकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बोटीच्या साहायाने अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. पाण्याचा वेग, अंधार असल्याने मध्य रात्री दीड वाजेपर्यंत १२ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ
जोरदार झालेल्या पावसाने नाशिक धरण क्षेत्रातुन गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या सर्वच नद्यांमुळे जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असुन नदीकाठी असलेल्या विद्युत मोटारी शेतकऱ्यांनी सुरक्षित स्थळी हलवण्याची लगबग दिसुन येत आहे. नदीकाठी असलेल्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा - VIDEO : गोदावरी नदीच्या पुरात युवकांची जीवघेणी स्टंटबाजी