औरंगाबाद - जिल्ह्यात सर्वदूर मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने खरीप पिके वाया जाण्याची भीती बळावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार चालू आहे. त्यामुळे वैजापूर - पैठण - कन्नड या भागांमध्ये पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
औरंगाबादच्या पाचोडमध्ये अतिवृष्टी, पिकांचे मोठे नुकसान औरंगाबाद जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या 170 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले, तलाव, ओसंडून वाहत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून जायकवाडीचे दरवाजे देखील उघडण्यात आले आहेत. त्यातून पाण्याचा मोठा विसर्ग नांदेडकडे झेपावले आहे. त्यातच गोदावरी पात्रातील सर्व मध्यम प्रकल्प व ओसंडून वाहत आहे. त्यामुळे पिकांचे होणारे नुकसान पाहता आता सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.गेल्या दोन दिवसांमध्ये पैठण आणि वैजापूर या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. वैजापूर जवळच्या नारंगी मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला, अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने तालुक्यातील दहा गावांचा संपर्क तुटला होता. दरम्यान नारंगी मध्यम प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे पिकांचं मोठे नुकसान झाले. मागील चौदा वर्षात पहिल्यांदाच नारंगी मध्यम प्रकल्पात 92 टक्के जलसाठा झाल्याने, दोन दिवसांपासून 72 वेगाने विसर्ग नारंगी नदीपात्रात सोडण्यात आला. 2006 मध्ये प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर 14 वर्षानंतर या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्याची ही वेळ आहे. तर दुसरीकडे गुरुवार आणि शुक्रवारी पैठण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर पाचोड परिसरात ढगफुटी झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. सलग चार तास झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
पाचोडसह परिसरातील अनेक गावातील घरांमध्ये पाणी गेल्याने गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागली. पैठण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. पाचोड महसूल मंडळातील पाचोडसह थेरगाव, लिमगाव, हर्षी, बाबर वाडी, नांदर, दादेगाव, कडेठाण, मुर्मा या परिसरात अतिवृष्टी झालेली आहे. सततच्या पावसाने कपाशी लागलेली बोंडे खाली पडायची वेळ आली आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन, बाजरी कणसांना कोंब फुटले आहेत. सर्वच पिके धोक्यात आल्याने शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. यामध्ये फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोसंबी, डाळिंब बागेत पाणी साचल्याने फळबागांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावन्याची भिती निर्माण झाली आहे. सरकारने या सर्व पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी हा प्रश्न निर्माण झाला आहे.