औरंगाबाद - घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. महाशिवरात्री निमित्त घृष्णेश्वर येथे महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी रात्रीच गर्दी केली. सुरक्षेसाठी मंदिर परिसरात जवळपास 300 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. देशात असलेले इतर ज्योतिर्लिंग उत्तरामुख आहेत. त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केल्यावर पाणी उत्तरेला पडत. मात्र घृष्णेश्वर देवस्थान हे पूर्वाभिमुख आहे. येथे अभिषेक केल्यावर पाणी पूर्वेला पडते. फलदायी आणि पूर्णस्थान म्हणून ओळख घृष्णेश्वराची आहे.
हिंदू धर्मात घृष्णेश्वराचे दर्शन महत्वाचे मानले जाते. हे देशातील बारा ज्योतिर्लिंग पैकी शेवटचे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे इथे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही, अशी आख्यायिका आहे. वेरूळ मधील ऐतिहासिक घृष्णेश्वर मंदिरात दरवर्षी लाखोच्या संखेने भाविक दर्शनसाठी येतात.
मंदिराचे निर्माण दहाव्या शतकात राष्ट्रकुट वंशातील राजा कृष्ण देवराय यांनी केले होते. हे मंदिर लाल रंगाची माती आणि दगड वापरून केलेले असून एकोणीसाव्या शतकात इंदोरची राणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोधार केला. जो पर्यंत वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन घेत नाही, तो पर्यंत अकरा ज्योतिर्लिंगाचे घेतलेले दर्शन सफल होत नाही, असे मानले जाते.
महाशिवरात्री निमित्त येथे विशेष व्यवस्था भाविकांसाठी केली आहे. यावर्षी सीसीटीव्हीसह ड्रोन कॅमेऱ्याने विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. मंदिर परिसरात जवळपास 300 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. औरंगाबाद शहरासह इतर ठिकाणाहून येणारी वाहतूक वळवण्यात आली आहे.