औरंगाबाद - जनावरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याची जनावरे चोरुन नेणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. आयशर चालवणारा चालक आणि क्लिनर यांनी काही लोकांचे संगणमत करून स्वतः आयशर व जनावरे चोरली आहेत. चालक अमजद अहमद कुरेशी (वय 30 रा. नुतन कॉलनी) आणि क्लीनर मंगेश पोळ (रा. छावणी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दौलताबादकडून जनावरे घेऊन जात असताना सकाळी 6 वाजता नाशिक औरंगाबाद रोडवर पिंपळगाव फाटा येथे तीन जणांनी आयशर अडवून चालकाकडून ट्रक व जनावरे हिसकावल्याचे, चालक अहमदने आयशर मालकाला सांगितले. त्यावरून आयशर मालक मोहम्मद खाजामिया कुरेशी यांनी सिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. नंतर गुन्ह्याचा तपास सुरु झाला. हायवेवर गुन्हा घडल्यामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेला करण्याचे आदेश दिले. घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर आयशर चालक आणि क्लिनर यांची स्थानिक गुन्हे शाखेने चौकशी केली. त्यात दोघांच्या जबाबात तफावत अली. त्यानंतर क्लिनर पोळ याला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने सचिन तायडे नावाच्या अट्टल गुन्हेगारासोबत मिळून 20 हजार रुपयांसाठी आयशर आणि जनावर तायडेला दिल्याचे सांगितले.
आयशर आणि जनावरे मिळून पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून 19 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सचिन तायडे आणि त्याचे साथीदार अजून फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि भागवत फुंदे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.