औरंगाबाद - जिल्ह्यात आज 1 जूनपासून सशर्त दारूची दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. शहरी भागात घरपोच, तर ग्रामीण भागात थेट दारू विक्रीला सुरुवात करण्यात आली. शहरी भागात ऑनलाइन दारू मागावण्यासाठी मद्यप्रेमींनी ऑनलाईन अर्ज केल्याचे पाहायला मिळाले.
मार्च महिन्याच्या मध्यात औरंगाबाद जिल्ह्यातील दारूची सर्व दुकान बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून मद्याची सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यातील अनेक शहरांमध्ये मद्यविक्रीला सशर्त परवानगी देण्यात आली होती. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात ही परवानगी देण्यात आली नव्हती.
शहरी भागात ऑनलाइन मद्याविक्री करत असताना काही नियम लावण्यात आले आहेत. प्रत्येक दारू दुकान चालकाने काही क्रमांक आपल्या दुकानांवर दिले आहेत. ग्राहकांनी त्या क्रमांकावर व्हाट्सअॅप मेसेज करायचा आहे. त्यानंतर त्यांना एक लिंक येईल. त्यावर लोकांनी आपली ऑर्डर द्यायची आहे. परवाना धारक ग्राहकांना तसेच परवाना नसणाऱ्या ग्राहकांना परवान्यासह मद्यविक्री केली जाणार आहे. घरी सेवा देणाऱ्या व्यक्तीला देखील परवाने देण्यात आले आहेत. या व्यक्तीने तोंडाला मास्क, हातात ग्लब्स घालून सुरक्षित राहून सेवा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 5 पर्यंत सेवा देता येणार आहे, तर ग्रामीण भागात थेट दुकानातून ग्राहकांना मद्य खरेदी करता येणार आहे. मात्र, हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचे पाळणे बंधनकारक असणार आहे. सकाळपासून ग्रामीण भागात मद्य दुकानासमोर रांगा लागल्याच पाहायला मिळाले आहे.