औरंगाबाद - कोरोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी एक सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिक आपापल्या परिने मदत करत आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील काही नागरिकही यासाठी पुढे आले असून त्यांनी आपापल्या परिने काही मदतनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यासाठी ग्रामपंचायतकडे सुपूर्द केला.
ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यासाठी वडाळी येथील साईं अमृत मिल्कचे चेअरमन संकेत राजेंद्र पाटील बनकर यांनी चिकलठान ग्रामपंचायतीस 51 हजार तर वडाळी व जैतखेड़ा ग्रामपंचायतीला प्रत्येकी 25 हजाराचा धनादेश सुपूर्द केला. या रकमेत सॅनिटायझर, मास्क, टिशु पेपर, औषध गोळ्या, हैण्डग्लव्हज, हँडवाश, साबन, फवारणीसाठी सोडियम हायपोक्लोराईट व कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लागणारे साहित्य तसेच गरजू कुटुंबाना, जीवनावशक वस्तू देण्यासाठी ही मदत करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील अंधानेर ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री निधीमध्ये 51 हजार रुपयांचा धनादेश तहसीलदार संजय वारकड यांचाकडे सुपूर्द करण्यात आला.
कॉवेनंट सोशल सर्विस या सामाजिक संस्थेच्या वतीने भोकनगाव येथे कोरोना विषाणूपासून बचाव करण्याबाबत जनजागृती तसेच मास्क, सॅनिटायझर,आणि साबण असे संरक्षण साहीत्य वाटप करण्यात आले. यावेळी आमदार उदसिंग राजपुत, सुनिता केसकर, अतुल धाटबळे, ऋषीकेश खोत, सुधीर मगर व इतर ग्रामस्थ उपस्थीत होते.