औरंगाबाद : पाकव्याप्त कश्मीर (Pakistan Occupied Kashmir issue) भारतात आणण्याच्या हालचालीला वेग येत असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून केल्या जात आहेत. भारतीय लष्कर त्यासाठी सक्षम असलं, तरी त्याला राजकीय नेत्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. युद्ध हे सर्वात शेवटचे हत्यार आहे. त्याआधी वेगवेगळ्या बाजूने दबाव टाकला जातो, असं मत लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे (Lt Col Dr Satish Dhage) यांनी व्यक्त (expressed his opinion) केलं.
भारतीय जवान सक्षम : पाक व्याप्त कश्मीर देशाचा अविभाज्य घटक आहे. लष्कर अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी वेळोवेळी त्याबाबत वक्तव्य केले आहे. एक प्रस्ताव देखील सरकारने पारित केला होता. जनरल द्विवेदी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यावर उत्तर देताना माहिती दिली की, आजही कश्मीरमध्ये 160 अतिरेकी लपून बसलेले आहेत. पाकिस्तान सोबत युद्धबंदी कायदा लागू आहे. मात्र हल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर मिळेल. देश हा सक्षम आहे, मात्र युद्ध हा शेवटचा पर्याय आहे. त्याआधी राजकीय आणि जागतिक पातळीवर दबाव टाकण्याचे काम केलं जातं. पाकिस्तानमध्ये लष्कर आणि राजकीय मंडळींवर तिथली जनता नाराज आहे. त्यात बलुचिस्तानला आपण सोबत घेत जर नीती आखली, तर पाकिस्तानवर दबाव टाकणं आणखी सोपे होईल. तरीदेखील पाक व्याप्त कश्मीर मिळवणे आव्हानात्मक असेल, असं मत लेफ्टनंट कर्नल डॉ सतीश ढगे यांनी व्यक्त केलं.
चीनचा धोका अधिक : पाकिस्तान वर कारवाई करताना चीनचा धोका भारताला आहे. पाकिस्तान सोबत चीन एकत्रित आपल्यावर हल्ला करू शकतो. त्यामुळे हा एकत्रित धोका मानला जातो. चायना सध्या पाकिस्तानपर्यंत कॉरिडॉर तयार करत आहे. त्यासाठी मोठे पैसे त्यांनी लावले आहेत. त्यामुळे चीनचा धोका आपल्याला अधिक आहे. सध्या पाक व्याप्त कश्मीर ताब्यात घेण्याच्या चर्चा रंगवल्या जात आहे. मात्र ही मानसिकता तयार करण्याचे काम केले जात आहे. युद्ध कधीही सांगून तयार होत नाही, त्यासाठी सरप्राईज हल्ला हा करावा लागतो. पाकिस्तान मधली आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहून भारताने संधी साधून एकदम कमी वेळात आणि नियोजनबद्ध कारवाई केल्यास पाकव्याप्त काश्मीरमधील काही भाग भारतात जोडणे शक्य होईल, असं मत लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केलं.
राजकीय फायद्यासाठी वक्तव्य शक्य : पाकिस्तान विरोधात कारवाई करण्याचे वक्तव्य केल्याने देशात वेगळं वातावरण निर्माण होतं. देशात आगामी निवडणुका लक्षात घेता असे वक्तव्य केले जाऊ शकतात. याआधी सर्जिकल स्ट्राइक सारखे प्रयोग करण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये सरकार विषयी एक वेगळी भावना निर्माण झाली होती. येणाऱ्या निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीची कारवाई केली तर ती शक्य आहे, असं मत लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केल.