औरंगाबाद - सातवा वेतन आयोग लागू करा, या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले. सातव्या वेतन आयोगाचे लाभ दिले नाहीत तर १ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलनात सहभागी होऊ, असा इशारा महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघटना राज्य समन्वयक डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिला.
केंद्र आणि राज्य सरकारने सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करून दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. राज्य शासनाने उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातील प्राध्यापक प्रवर्गाला आयोग लागू केला आहे. राज्यातील 14 विद्यापीठातील कर्मचारी-अधिकाऱ्यांना आयोगाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य शासन, मंत्र्यांसोबत वारंवार बैठका झाल्या आहेत. मात्र, सातव्या वेतन आयोगासह कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती असे अनेक विषय प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळेच हे आंदोलन करण्यात आले असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
हेही वाचा - जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही खासगी डॉक्टर काम करण्यास येईना
महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या कृती समितीने गेल्या आठवड्यात ऑनलाइन पद्धतीने बैठक घेऊन 24 ते 30 सप्टेंबर दरम्यान लेखणीबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. तर १ ऑक्टोबरपासून सर्व कर्मचारी काम बंद करून संपात सहभागी होतील, असा इशारा यावेळी देण्यात आला होता. राज्य शासन केवळ तोंडी आश्वासन देत आहे. त्यामुळे विद्यापीठ कर्मचाऱ्यांची दिशाभूल होत असल्याचा आरोप या आंदोलनात करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर सातवा वेतन आयोग आणि इतर मागण्या मान्य कराव्या अन्यथा विद्यापीठ कर्मचारी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघटना राज्य समन्वयक डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी दिला.
हेही वाचा - औरंगाबादेत ओला दुष्काळ जाहीर करा, सत्ताधारी काँग्रेसची मागणी