छत्रपती संभाजीनगर Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मराठवाडा कनेक्शन पुढं आलं आहे. विशेष म्हणजे ससूनमधून ललित पाटील पळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात काही वेळ थांबल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस आता ललित पाटील थांबलेल्या ठिकाणाची झाडाझडती घेत आहेत. विशेष म्हणजे ललित पाटीलनं मराठवाड्यात आपलं जाळं पसरलं असून ड्रग्जसाठी लागणारा कच्चा माल तो मराठवाड्यातून घेत असल्याचं पुढं आलं आहे. डीआरआयनं अडीचशे कोटीचे अमली पदार्थ देखील जप्त केले होते. त्यामुळे ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाची पाळंमुळं खूप खोलवर रुजलेली असल्याचं उघड होत आहे.
कच्चा माल पुरवठा जिल्ह्यातून : ड्रग्ज प्रकरणात ललित पाटीलला अटक केल्यानंतर त्याचं मराठवाडा कनेक्शन पुढं आलं आहे. गुजरात, पुणे, मुंबई विभागाची छापेमारी वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे. ललित पाटीलचं कनेक्शन गुजरातसह मराठवाड्यात असल्याचं उघड झालं. ललित पाटील कोकेन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल, विविध रसायनं मराठवाड्यातून घेत असल्याचं पुणे पोलिसांच्या तपासात उघड झालं. त्यामुळे ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यावर कोणाकोणाच्या संपर्कात राहिला, याबाबत तपास सुरू आहे.
ललित पाटीलचा संभाजीनगरात मुक्काम : ललित पाटील ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर त्यानं अगोदर नाशिक गाठलं. मात्र त्यानंतर मराठवाड्यात असलेल्या त्याच्या जवळच्या लोकांच्या तो संपर्कात होता, अशी माहिती पोलीस तपासात उघड होत आहे. ससूनमधून पळून गेल्यानंतर तो नाशिक, धुळे मार्गे छत्रपती संभाजीनगर इथं थांबून नंतर कर्नाटकमध्ये गेला होता. शहरात आल्यावर तो बराच वेळ थांबला आणि काही जणांच्या त्यानं भेटी घेतल्या असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याबाबत अधिक तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
शहरात जप्त झाले अडीचशे कोटींचे अमली पदार्थ : पुणे, मुंबई, गुजरात पोलीस आणि महसूल गुप्तचर संचलनालयाच्या पथकानं 22 ऑक्टोबरला शहरातील एका व्यापाऱ्याच्या घरावर छापेमारी केली. जितेश कुमार हिन्होरिया असं त्याचं नाव आहे. यावेळी पथकानं अडीचशे कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. यावेळी जितेश कुमार यानं काचेचा तुकडा गळ्यावर आणि हातावर मारून घेतल्यानं त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. लवकरच त्याची प्रकृती स्थिरावेल, त्यानंतर त्याला न्यायालयाच्या समोर हजर केलं जाणार आहे. मात्र मागील दोन आठवड्यातील घटनाक्रम लक्षात घेता राज्यात ड्रग्जचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात चालत असून, त्याचं नेटवर्क मराठवाड्यासह देशातील विविध भागात जोडलं गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरात सुरू झाली तपासणी : शहरात अमली पदार्थ जप्त करण्यात आल्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी रासायनिक कंपन्यांची तपासणी करण्यासाठी पथक स्थापन केलं. यात गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. पथक शेंद्रा, पैठण आणि औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या छोट्या कंपन्यांची तपासणी करत आहे. केमिकल किंवा औषधी व्यवसायाची निर्मिती असलेल्या कंपन्यांची विशेष करून तपासणी हे पथक करणार आहे. संशयास्पद प्रकार आढळला तर तातडीनं कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी फूड अँड ड्रॅग्ज म्हणजेच अन्न व औषधी प्रशासन विभागाची मदत घेतली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली आहे.
हेही वाचा :