औरंगाबाद- शहरातील टिळकपथ येथील श्रीमान श्रीमती कपड्याच्या दालनाच्या इमारतीचे काम सुरू असताना विजेचा झटका बसून एक कामगार तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या कामगारावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. विजय चंद्रकांत पंडित (२३, राहुलनगर) असे गंभीर जखमीचे नाव आहे.
शहराचे हृदय समजले जाणाऱ्या गुलमंडी येथील श्रीमान-श्रीमती कपड्याच्या दालनाच्या तिसऱ्या मजल्यावरील काम सुरू आहे. यासाठी बाहेरुन बांबू लावण्यात आले आहेच. विजय या बांबूवर काम करत होता. परंतु इमारतीच्या कोपऱ्यावर पथदिव्याचा खांब व विजेच्या तारांचे मोठे जाळे आहे. बांबूवर काम करत असताना तो तारेच्या संपर्कात आला व मोठा जाळ झाला. विजेचा झटका बसल्याने तो तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळला.
अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतु तोपर्यंत त्याला गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरा क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्याचा जवाब नोंदवण्यासाठी रुग्णालयात गेले होते. हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.