कन्नड (औरंगाबाद) - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात इतर राज्यातुन कामासाठी आलेले मजूरांसाठी मजुर निवारा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यात या मजूरांच्या निवास, आरोग्य, भोजन व्यवस्थेकरीता प्रशासनामार्फत दिलीप बिल्डकॉन लि. कॅम्प रेल येथे ३०३ मजुरांसाठी आणि कल्याण टोल इन्फ्रा लि. कॅम्प मौजे सिरसगाव येथे ५७ मजुरांसाठी मजुर निवारा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत.
परराज्यातील मजूर प्रशासनाची नजर चुकवून बेकायदेशीररीत्या आपल्या राज्यात पायी-पायी प्रवास करत आहेत. अशा मजुरांचे स्थलांतर रोखून त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. कन्नड येथे छत्रपती शिवाजी महाविद्यालय, नवोदय विद्यालय येथे पिशोर येथील समता विद्यालय, देवगाव (रं) येथे गणेश शिक्षण संस्था आणि मौजे तेलवाडी येथील कै. वसंतराव नाईक आश्रमशाळा येथे ही नियोजित व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय ग्रामीण रुग्णालय कन्नड येथे शिवभोजन केंद्र सुरळीतपणे सुरू आहे.
मजूर निवारा केंद्रातील मजुरांची निवास व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, भोजन व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, इत्यादी व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मजुरांच्या निगराणीसाठी स्वतंत्र पथक गठीत करण्यात आले आहे. मजुरांसाठी सकाळी नाश्ता, दुपारी आणि संध्याकाळी भोजन यवस्था करण्यात आली आहे. तर साबण, सॅनिटायझर, मास्क इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. मजुरांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून कोरोना विषाणूबाबत वेळोवेळी प्रबोधन करण्यात आले आहे.
हेही वाचा - सीएसआर फंड मुख्यमंत्री सहायता निधीतही उपलब्ध करून द्यावा
रेल येथील दिलीप बिल्डकॉन लि. या कंपनीच्या 303 मजुरांसाठी कोरोना कोविड 19 च्या अनुषंगाने जनजागृती करण्यात येऊन यासाठी कशाप्रकारे काळजी घेण्यात यावी? सोशल डिस्टंसिग कशी ठेवावी? याबाबत उपविभागीय अधिकारी कन्नड जनार्धन विधाते, तहसिलदार संजय वारकड यांनी मार्गदर्शन करुन मजुरांची करमणूक होईल म्हणून कॅम्पमध्ये गायन, बासरीवादन, इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम घेत आहेत.
तालुक्यातील दोनही कॅम्पला उपविभागीय अधिकारी कन्नड जनार्धन विधाते, तहसिलदार संजय वारकड, नायब तहसिलदार स्वप्नील खोल्लम, शेख हारून अजीज, अ.का. सत्यजित आव्हाड यांनी बुधवारी भेट दिली. यावेळी तेथे मजुरांच्या व्यवस्थेबाबत आढावा घेऊन मजुरांची दर 3 दिवसाला वैद्यकीय तपासणी होत असल्याची खात्री करण्यात आली. यावेळी मजुरांनी प्रशासनाकडून घेण्यात येत असलेली खबरदारी आणि व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा - या काळातही लहान मुलांच्या प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्रयत्न करा - जागतिक आरोग्य संघटना