औरंगाबाद : आपल्या आयुष्यात एक तरी प्रेरणास्त्रोत असतो. तो कधी घरी असतो तर कधी बाहेर असतो. कोमलच्या जीवनात तिचे प्रेरणास्तोत्र तिची आई ठरली. मुलांना उच्चशिक्षित करायचे ही जिद्द आईची होती आणि त्यासाठी ती काही करायला तयार होती. तेच बघून कोमलला अभ्यास करण्याचा हुरूप आला. आठवीपर्यंत मराठी शाळेत शिकल्यानंतर, नवोदयची परीक्षा देऊन तिने सीबीएससी अभ्यासक्रमाचे शिक्षण प्राप्त करायला सुरुवात केली. देशात कॉमर्स अभ्यासक्रमात अग्रगण्य असणाऱ्या नर्सी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक येथे प्रवेश मिळवला. घरची परिस्थिती बेताची असल्याने महिन्याला पाचशे रुपये खर्चायला मिळत होते. त्यात रोज वीस रुपये प्रवासाला लागत असल्याने तिने अपार कष्ट करत कधी पायी प्रवास केला होता. महाविद्यालय आणि क्लासमधे जाताना लागणारा वेळ पाहता हॉस्टेलला जाऊन दुपारचे जेवण करणे शक्य नव्हते. अडीच वर्ष तिने बहुतांश दिवस आपले दुपारचे जेवण केले नाही. फक्त अभ्यासाचे ध्येय ठेवून रोज सोळा तास अभ्यास करून तिने आपली तयारी पूर्ण केली. तिच्या मेहनतीचे फळ म्हणून ती सीएची परीक्षा उत्तीर्ण झाली. या यशाचे पूर्ण श्रेय ती आपल्या आईला देते.
मुलीच्या शिक्षणासाठी आईने केले काबाडकष्ट : कोमल हुशार असल्याने आपल्या मुलीचे शिक्षण इंग्रजी शाळेत व्हावे असे आईला वाटत होते. त्यामुळे तिला घेऊन ती लहानपणी इंग्रजी शाळेत गेली. मात्र त्यावेळेस आई वडील पदवीधर असले, तरच मुलांना इंग्रजी शिक्षण दिले जाईल असे सांगण्यात आले. त्यामुळे आपल्याप्रमाणे आपल्या मुलीलाही आता शिक्षणासाठी झगडाव लागेल हे आईला कळाले होते. मात्र कोमलने जिद्द ठेवत आईच्या स्वप्नपूर्ती कडे प्रवास सुरू केला होता. ते बघून आईने देखील तिच्यासाठी कष्ट करायला सुरुवात केली. मुंबईमध्ये राहून मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणे, चांगल्या कोचिंग क्लासमध्ये अभ्यास पूर्ण करणे हे परिस्थितीला झेपण्यासारखे नव्हते. मात्र आईने आठ तास कंपनीत काम करत, घरी आल्यावर इतरांचे कपडे शिवण्याचे काम केले. इतकेच नाही तर फावल्या वेळात समारंभाच्या ठिकाणी पोळ्या करून देण्याचे देखील काम केले आणि मुलीसाठी शिक्षणासाठी पैशाची पायाभरणी केली. सुरुवतीला मुलीला हॉस्टेलमध्ये जागा मिळत नसल्याचे पाहून, मुंबई येथे मोठ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या दालनाची उंबरे तिने झिजवले. आज तिच्या कष्टाचा फळ मिळाले असल्याने आता आपण खूप खुश आहोत असे कोमलच्या आई विजयमाला इंगोले यांनी सांगितले.
वडिलांची परिस्थिती आहे बेताची : कोमलचे वडील मुंजाजी इंगोले यांचे सातारा परिसरात चप्पल- बूट विक्रीचा छोटसे दुकान आहे. आधी व्यवसाय ठीकठाक चालत होता, मात्र व्यवसायात चढ-उतार आल्याने परिस्थिती बेताची झाली. त्यामुळे त्यांनी चप्पल बूट शिवायला सुरुवात केली. घरी दोन मुले, एक मुली अशी त्यांना अपत्य आहे. हातावर पोट असल्याने त्यांना अन्न, वस्त्र, निवारा इतकेच देणे त्यांना शक्य झाले. मात्र त्या परिस्थितीवर मात करत कोमलने सीएची परीक्षा उत्तीर्ण केली. ती परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा ऐकल्यावर पूर्ण आयुष्य डोळ्यासमोरून गेले. आता मात्र उजेड्याकडे आलो असे वाटत असल्यास कोमलचे वडील मुंजाजी इंगोले यांनी सांगितले.
कोमलला पूर्ण करायचे एमबीए : परिस्थितीशी झगडत कोमलने सीएची परीक्षा पास केली. आता तिला बँकेत नोकरी करायची आहे. आपल्या आई-वडिलांनी कष्ट करून आपल्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यास मदत केली. मात्र आता तिला घराची आर्थिक स्थिती चांगली करायची आहे. इतकेच नाही तर नोकरी करत, आपले एमबीए देखील पूर्ण करायचे आहे. आयुष्यात पुन्हा आई-वडिलांना असे कष्ट करण्याची वेळ येऊ नये, त्यासाठी ती आता सज्ज झाली आहे. कोमलचा आदर्श इतरांनी घेतल्यास परिस्थितीवर मात करता येईल हे नक्की.