छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - भाजपा नेता किरीट सोमैय्या यांनी छत्रपती संभाजीनगरात दाखल होत सीए उपेंद्र मुळे यांच्या घरी भेट दिली. सीए उपेंद्र मुळे यांनी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाने किरीट सोमैय्या यांना शहरात पाय ठेवू देणार नाही, अशी धमकी दिल्यानंतरही ते शहरात दाखल झाले आहेत. सोमैय्या यांच्या छत्रपती संभाजीनगरातील या दौऱ्यात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आले होते.
शहराला आले छावणीचे स्वरुप : किरीट सोमैय्या यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणी क्वचितच दिसले. किरीट सोमैय्या अचानक शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे अगोदरच किरीट सोमैय्या यांना केंद्र सरकारची सुरक्षा असताना पुन्हा शहर पोलीस दलातील जवानांचा बंदोबस्त लावण्यात आला. किरीट सोमैय्या यांच्या या दौऱ्यात केंद्रीय मंत्र्यांपेक्षा अधिक सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली. जवळपास तीनशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. त्यात पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. विमानतळ येथून हा ताफा थेट सीए उपेंद्र मुळे यांच्या निवासस्थानी पोहोचला. तिथे देखील मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला. परिसरातील पूर्ण रस्ता बंद करण्यात आला. भर वस्तीत इतके पोलीस आल्याने अनेक चर्चा रंगल्याचे दिसून आले. किरीट सोमैय्या नेमके आले कशासाठी हा प्रश्न निर्माण झाला. सीए उपेंद्र मुळे यांच्याशी भेट घेतल्यानंतर ते सुभेदारी विश्राम गृह येथे विश्रांतीसाठी गेले.
काही तासांनी कारण आले समोर : शिवसेना खासदार भावना गवळी यांनी आर्थिक व्यवहाराचे खोटे कागदपत्र तयार केल्याचा आरोप सीए उपेंद्र मुळे यांनी केला होता. त्यावेळी किरीट सोमैय्या यांनी हा विषय उचलून धरत कारवाईची मागणी केली होती. सीए मुळे यांच्या सासूंचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे सांत्वन करण्यासाठी किरीट सोमैय्या आले होते. त्यानंतर रात्री ते वास्तव्यास राहिले आहेत. मात्र, शहरात लागलेला पोलीस बंदोबस्त चर्चेचा विषय झाला आहे.
हेही वाचा -