औरंगाबाद - भारतीय जनता पक्षात बहुजनांवर अन्याय केला जातोय, असा आरोप भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी केला. पुढील पंचवीस वर्षांत पक्षांतर्गत बहुजन स्पर्धक असून नये, यासाठी हे षडयंत्र असल्याचे ते म्हणाले. बहुजनांची दावेदारी मोडून काढण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचे गायकवाड सांगितले. काही दिवसांपूर्वी गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. यानंतर त्यांनी आज भाजपाच्या पक्षांतर्गत राजकारणावर टीका केली.
भाजपात दानवे आणि पंकजा मुंडेंवर अन्याय
भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांना पक्षात दाबले जात असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. पंकजा मुंडे यांना मुद्दाम त्यांच्या मतदारसंघात येऊ दिले जात नाही. यासाठी बाहेरील राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर दिली जाते. भाजपाने खडसेंना मातीमोल केले. तावडेंच काय झालं, हे सर्वांना माहिती आहे. यावरूनच भाजपात बहुजनांवर अन्याय होत असल्याचे स्पष्ट होतं, असे ते म्हणाले. पक्षाची सामूहिक निवड प्रक्रिया फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी संपवली आहे. त्यामुळेच माझ्यासारखा कार्यकर्ता दुरावत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
या आधी गडकरींमुळे पुन्हा भाजपात आलो होतो
मी भाजपकडून दोन वेळा आमदार आणि तीन वेळा खासदार राहिलो. मात्र काही काळानंतर मला योग्य वागणूक देण्यात आली नाही. त्यानंतर मी राष्ट्रवादीत गेलो. मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या आग्रहास्तव मी भाजपात पुन्हा भाजपात आलो. बारा वर्षे मला बांधून ठेवण्यात आले. मला आमदार-खासदार व्हायचं नाही. मात्र पक्षातील काही जबाबदारी मागितल्यानंतरही काम दिले जात नव्हते. मला पक्ष वाढीसाठी काम करायचं होत. मात्र माझ्या अनुभवाचा उपयोग त्यांनी घेतला नाही. त्यामुळे मी पुन्हा राष्ट्रवादीत आलो, असे गायकवाड म्हणाले. आता कोणतही पद नाही मिळालं तरी चालेल. पण राष्ट्रवादीत राहणार असल्याचा निर्धार केला आहे, असे जयसिंग गायकवाड यांनी स्पष्ट केले.