औरंगाबाद- मराठवाड्याला वरदान ठरलेल्या जायकवाडी धरणाचे गेल्या एक महिन्यापासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. आतंकवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या या धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.
महावितरणने धरण प्रशासनाला नोटीस
जायकवाडी धरणाचे 5 लाख 42 हजार 74 रुपयांचे वीजबिल थकले आहे. या जोडणीचे 31 मार्च 2020 रोजी शेवटचे बिल भरलेले आहे. तर ज्ञानेश्वर उद्यानाचे 13 लाख 60 हजार 812 रुपयांचे वीजबिल थकलेले आहे. या जोडणीचे 20 मार्च 2020 रोजी शेवटचे बिल भरलेले आहे. जवळपास वर्षभरापासून वीजबिल न भरल्यामुळे दोन्ही जोडण्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची महावितरणने धरण प्रशासनाला नोटीस दिली होती. तसेच नोटीस दिल्यानंतरही 15 दिवस महावितरणने वारंवार बिल भरण्याची विनंती केली. मात्र, त्यानंतरही धरण प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने धरणाचा वीजपुरवठा 22 फेब्रुवारी 2021 रोजी तर उद्यानाचा वीजपुरवठा 24 फेब्रुवारी 2021 रोजी नाईलाजास्तव खंडीत करावा लागला, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद
आतंकवाद्यांच्या हिटलिस्टवर असणाऱ्या जायकवाडी धरणाचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे निदर्शनास आले याबाबत विचारले असता वीज पुरवठा खंडित झाल्याने इलाज नसल्याचे उत्तर कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले त्याचप्रमाणे धरणावर काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांची पगार गेल्या सहा महिन्यापासून झाले नसल्याचं उघडकीस आले. अति संवेदनशील असलेल्या या महाकाय धरणाची सुरक्षा अध्याप रामभरोसे आहे. जायकवाडी धरणाला सुरक्षा देणारे सुरक्षा रक्षक गेल्या सहा महिन्याच्या पगार न झाल्यामुळे वैतागले आहेत. अशा परिस्थितीत धरणाच्या सुरक्षची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न निर्माण होत आहे?
हेही वाचा- बीड जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून दहा दिवस लॉकडाऊन