औरंगाबाद - आरोपीला अटक न करण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस जमादाराला लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. औरंगाबादच्या जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अटक न करण्यासाठी आणि तपासात मदत करण्यासाठी मजूराकडून पंधरा हजारांची लाच स्विकारणाऱया जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या जमादाराला एसीबीच्या पथकाने सोमवारी रात्री रंगेहाथ पकडले. यमाजी लक्ष्मण खटाणे ( वय.५१) असे लाच स्वीकारलेल्या जमादाराचे नाव आहे.
गारखेडा परिसरातील इंदिरानगर भागात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना जवाहरनगर पोलिसांनी मजूर संतोष बबनराव दळवे (वय.३०, रा. अलोकनगर) याला सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुंजाबाई चौकात पकडले होते. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास मजूर संतोष दळवे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा तपास जमादार खटाणे यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यानंतर खटाणेने दळवेंना गुन्ह्यात अटक न करता तपासात मदत करण्यासाठी पंधरा हजारांच्या लाचेची मागणी केली. मात्र, दळवे यांनी सोमवारी एसीबीचे अधीक्षक अरविंद चावरीया यांची भेट घेऊन जमादार खटाणेविरुध्द तक्रार दिली. त्यानंतर अधीक्षक चावरीया, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महादेव ढाकणे, पोलिस नाईक विजय बाम्हंदे, बाळासाहेब राठोड, दिगंबर पाठक, रवि देशमुख, व चांगदेव बागुल यांनी जवाहर कॉलनीतील बौध्दनगरात दळवेकडून लाच स्विकारताना जमादार खटाणेला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुध्द जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.