औरंगाबाद - 25 नोव्हेंबर हा दिवस जगातील महिला अत्याचार विरोधी दिवस (International Day For The Elimination Of Violence Against Women) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अत्याचार कमी झाल्याबाबत आनंद व्यक्त करायला हवा. मात्र, तसे न होता, महिला अत्याचारात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात पूर्वी महिला घराबाहेर असुरक्षित असल्याचं दिसून येत होतं. मात्र, आता महिला घरात देखील असुरक्षित असल्याचं दिसून येत आहे, असं मत महिला अभ्यासक मंगल खिवंसरा (Mangal Khivansara ) यांनी व्यक्त केलं.
महाराष्ट्रात महिला अत्याचार वाढले -
देशात एकंदरच महिलांवर होणारे अत्याचार हे वाढत चालले आहेत. त्यात काही मुख्य घटना अजूनही अनुत्तरीत असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते अमंगल खिवंसरा यांनी व्यक्त केलं. हैदराबाद घटना, कोपर्डी, निर्भया हत्या कांड, अकांक्षा देशमुख, श्रुती भागवत, श्रुती कुलकर्णी असे अशा अनेक घटना महिला अत्याचाऱ्याच्या घटना वाढल्याचं दाखवते. काही खटले चालू आहेत. त्यात, अद्यापही न्यायालयाकडून निर्णय झालेला नाही. त्यात राज्याचा विचार केला तर देशात महाराष्ट्र महिलांवरील अत्याचारात अग्रस्थानी येतो. त्यामध्ये विनयभंग होण्याच्या प्रकारात एक नंबरला, महिला अपहरण घटनेत दोन नंबरला, तर बलात्काराच्या घटनांमध्ये तीन नंबरला महाराष्ट्राचा नंबर लागतो. महिला अत्याचारात लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना अधिक आहेत. ही शोभणीय बाब नाही, अशी खंत मंगल खिंवसरा यांनी व्यक्त केली.
पूर्वीच्या काळी स्त्री घरात असेल तर ती सुरक्षित आहे, अशी भावना निर्माण होती. मात्र, आता महिला घराच्या बाहेर नाही, तर घरातही असुरक्षित आहेत, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. अत्याचार नुसता शारीरिक किंवा मानसिक होत नसून भावनिक देखील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. विशेषतः कोरोना काळामध्ये महिलांवर होणाऱ्या अंतर्गत अत्याचारात मोठी वाढ झाल्याचं माहिती मंगल खिंवसरा यांनी दिली. कोरोना काळामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य घरात होते. त्यावेळेस सर्वांची काळजी घेणे किंवा त्यांना हवं नको ती पाहण्याची जबाबदारी ही फक्त आणि फक्त महिलांवरच होती. मग त्यामध्ये पुरुषांना लागणारा चहा, नाश्ता, जेवण सतत वेगवेगळ्या डिमांड, या गोष्टी महिलांना परिपूर्ण करून द्यावा लागत होत्या. त्यातच त्या देखील एखाद्या ठिकाणी काम करत असल्या तर वर्क फ्रॉम होम करताना या सगळ्या जबाबदारी देखील तिला पार पाडाव्या लागत होत्या. आणि यातच अनेक वेळा घरेलू हिंसाचार मोठ्या प्रमाणात झाला. एकट्या महिलेने घरच काम करायचं, नौकरी करायची त्यातून होणार त्रास देखील छळ आहे. या सर्व परिस्थितीत महिला अत्याचार वाढले असंच म्हणता येईल, असे देखील मंगल खिवंसरा यांनी स्पष्ट केलं.
शक्ती विधेयकाची अंमलबजावणी कधी -
महिलांवरील वाढते अत्याचार पाहता शक्ती विधेयक राज्य सरकार पास करणार असं बोलले जात आहे. मात्र, कधी होणार असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. कोरोना काळात हा प्रस्ताव प्रलंबित होता. मात्र, आता हा प्रस्ताव पास करायला हवा आणि हा कायदा लागू झाला तर महिलांना नक्कीच दिलासा मिळू शकतो. यामध्ये काही विशिष्ट बाबी चांगल्या आहेत, तर त्याचबरोबर काही विशिष्ट बाबी या न पटणाऱ्या देखील असल्याचे मत मंगल खिंवसरा यांनी व्यक्त केलं. यामध्ये गुन्ह्याचा तपास 60 दिवसांच्या ऐवजी पंधरा दिवसात व्हायला हवा, असं म्हणला आहे. मात्र, साठ दिवस उलटूनही तपास लागत नाही. तो तपास पंधरा दिवसात कसा लागेल? हा प्रश्न निर्माण होतोय. त्याचबरोबर 36 विशेष न्यायालय हे सुरू करण्यात येतील असे म्हणले जाते. मात्र, पूर्वी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि न्यायालयात, असलेली यंत्रणा ही सक्षम आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून महिलांना चांगला न्याय मिळू शकतो. अशा परिस्थितीत 36 विशेष न्यायालयांची आवश्यकता नाही. कायदा सक्षम आणि परिणामकारक असला, तर निश्चितच महिला अत्याचाराला आळा बसेल. कायदा आणि सुव्यवस्था नाही, त्यामुळेच अत्याचार वाढत आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणे आणि दोषींना तातडीने शिक्षा झाली तरच महिलांवरील अत्याचार थांबवू शकतात, असे मत सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा यांनी व्यक्त केलं.