छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Inspection Of Damaged Crops : दुष्काळ असल्यानं पिकांच्या पाहणीसाठी केंद्राचं पथक जिल्ह्यात दाखल झालं. त्यांनी सकाळी छत्रपती संभाजीनगर तालुका आणि सोयगाव भागात पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. खरिपाच्या हंगामात कमी पावसाने मोठं नुकसान झालं असून सरकारने भरीव मदत द्यावी, शेतकऱ्यांनी काढलेलं कर्ज माफ करावं अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. (inspection of central Govt team at Soygaon)
कमी पावसामुळे झाले नुकसान : यंदा शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. सुरुवातीला पर्जन्यमान कमी झाल्यानं लावलेली पिकं वाया गेली. सरकारनं दुष्काळ जाहीर केला. तर थंडी सुरू होताच पावसाने अवेळी हजेरी लावली आणि आलेली पिकं देखील नष्ट झाली. त्याबाबत पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक मराठवाड्यात दाखल झालं आहे. हे पथक छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशीव या जिल्ह्यातील गावांना भेट देणार आहे. आजपासून हे पथक दोन दिवस मराठवाड्यातील चार जिल्ह्यात पाहणी करणार आहे. या पथकात एकूण दोन सदस्यांचा समावेश असून नऊ तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. या पाहणी दौऱ्यानंतर शुक्रवारी पुण्यात पथकाची बैठक होऊन केंद्राला नुकसान भरपाईचा अहवाल पाठवण्यात येणार आहे.
पथक सादर करणार अहवाल : आज केंद्रीय पथकाने औरंगाबाद तालुक्यातील सावंगी या गावाला भेट देत तेथील खरीप पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी तेथील शेतकऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला व चर्चा केली. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील पावसाची सरासरी ८३ टक्के आहे. त्यात नांदेड व हिंगोली जिल्हा वगळता मराठवाड्यातील अन्य सहा जिल्ह्यांतील पावसाची सरासरी कमालीची घसरलेली आहे. पेरणी उशिरा झाल्याने आणि पावसाच्या खंडामुळे सोयाबीनची उत्पादकता ५० टक्क्यांनी घटली. उत्पादकता निम्म्याहून खाली आल्याची आकडेवारी कृषी विभागाकडून केंद्रीय पथकासमोर मांडण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन यांच्यासह लावलेल्या पिकांचे नुकसान झाल्याचं पथकातील सदस्यांना सांगितलं. किमान खर्च आणि पीक कर्ज यांच्याबाबत भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तर दौरा पूर्ण झाल्यावर याबाबत आढावा घेऊ आणि कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले याबाबत अहवाल सादर करू अशी माहिती पथकातील सदस्यांनी दिली.
हेही वाचा: