औरंगाबाद - भारतीय संस्कृतीत करुणा आणि अहिंसेला अनन्य साधारण महत्व आहे. या दोन मुल्यांवर आधारित एक नव्हे तर अनेक धर्म भारतात एकत्र नांदतात. जगाला आज या मुल्यांची गरज असल्याचे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, भारतातील जातीव्यवस्था ही मोठी कमतरता असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान औरंगाबादेत जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दलाई लामा पुढे म्हणाले, "भारतातील हजारो वर्षे जुनी नितीमुल्ये आजच्या हिसेंच्या काळात समर्पक ठरतात. आज आधुनिक शिक्षणाबरोबर भारतातील नैतिकतेची शिकवण दिली जावी असे मला वाटते" डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलताना ते म्हणाले, "आंबेडकरांनी १९५६ साली समाजाला दिशा देण्याचे काम केले. ते या देशातील जातीव्यवस्थेविरोधात मोठे पाऊल होते. जातीव्यवस्था हा भारतातील एक अवगुण आहे. एकमेकांवर राज्य करण्याच्या भावनेतून ही व्यवस्था निर्माण झाल्याचे मला वाटते"
हेही वाचा - औरंगाबाद: तीन दिवसीय जागतिक धम्म परिषदेचे आयोजन, दलाई लामा राहणार उपस्थित
तुम्ही स्वत:ला भारतीय समजता का, या प्रश्नाला उत्तर देताना ते मिश्कीलपणे हसून म्हणाले, "६० वर्षे मी भारतातील चपाती आणि डाळ खाल्ली आहे. माझ्या मनात नालंदाचे विचार आहेत. त्यामुळे मी मनाने आणि शरीराने स्वत:ला भारतीय समजतो" दलाई लामा उद्या(24 नोव्हेंबर) धम्म परिषदेत बौद्ध भिक्कुंना संबोधित करणार आहेत.