औरंगाबाद - पैठण रस्त्यावरील टाकळी फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. संतोष लाटे, रामेश्वर सोनवणे (दोघे रा.खामगाव, ता. पैठण) अशी मृतांची नावे आहेत. तर बाळू एरंडे, गौतम सोनवणे (दोघे रा. जळगाव, ता. पैठण) अशी जखमी तरुणांची नावे आहेत.
बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद-पैठण मुख्य रस्त्यावरील टाकळी फाट्यावर बाळू एरंडे, संतोष लाटे आणि गौतम सोनवणे हे तिघे (एम एच 20 बी 9522) या क्रमांकाच्या दुचाकीवरून औरंगाबादच्या दिशेने जात होते. याच वेळी समोरून येणाऱ्या (एम एच 20 डि क्यू 2154) या दुचाकीशी समोरासमोर त्यांची धडक झाली. या अपघातात दुचाकी चालक रामेश्वर सोनवणेचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी संतोष लाटेला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता, की त्या दोन्ही गाड्यांचा पार चुराडा झाला आहे.
याबाबत एमआयडीसी पैठण पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात हालविले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.