औरंगाबाद - पहिली पत्नी असताना दुसरा विवाह करून पहिल्या पत्नीला पैशांसाठी त्रास देणाऱ्या पती, सासू आणि सासऱ्या विरोधात औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 38 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - राजेश टोपे हे फक्त जालन्याचेच आरोग्य मंत्री आहेत का? खासदार जलील यांचा प्रश्न
या आधीही झाली पोलीस तक्रार
38 वर्षीय विवाहितेचा विवाह 12 जुलै 2009 रोजी जालना जिल्ह्यातील सचिन गायकवाड याच्याशी झाला होता. सचिन हा भोकरदन येथील महावितरण कंपनीत लाईन ऑपरेटर असल्याने लग्नानंतर 2018 पर्यंत विवाहिता सासरी राहात होती. त्यानंतर औरंगाबाद शहरातील सावंगीत फ्लॅट घेतल्यानंतर विवाहिता सचिनसोबत आली. सचिन त्या काळात विकेंडला शहरात यायचा. त्यादरम्यान त्याच्यासह सासू-सासरे विवाहितेचा छळ करायचे. फ्लॅटसाठी साडेचार लाख रुपये आणल्याशिवाय घरात घेणार नाही, असे म्हणत सासू-सासऱ्यासह पती देखील विवाहितेला मारहाण करायचा. याप्रकरणी 2020 मध्ये भोकरदन पोलिसात तक्रार देण्यात आली होती. मात्र, त्रास सुरूच असल्याने महिलेने तक्रार निवारण केंद्रात तक्रार दिली.
जानेवारी महिन्यात घरातील सामान हलवले
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात अचानक फ्लॅटमधील सामान दुसरीकडे हलवन्यात येऊ लागले. विवाहितेने जाब विचारला असता पती, सासू, सासर्यांनी तिला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, 27 फेब्रुवारी 2021 रोजी पतीने दुसर्या महिलेशी विवाह केल्याचे समोर आले. त्यानुसार मुकुंदवाडी पोलिसात विवाहितेने तक्रार दिली आहे. त्यावरून पती सचिन गायकवाड, सासरा शांतवन गायकवाड व सासू लता गायकवाड यांच्याविरुद्द मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - सामाजिक भान राखत रुग्णवाहिका चालकांची ठरलेल्या दरात रूग्णसेवा