औरंगाबाद - राम मंदिराच्या भूमीपूजनावरुन आता शिवसेना आणि एमआयएममध्ये जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळची बकरी ईद घरीच साजरा करून प्रतिकात्मक कुरबानी द्या, असे सरकारने सांगितले. त्यावर आक्षेप घेत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी बकरी ईदप्रमाणे राम जन्मभूमीचे पूजनही प्रतिकात्मकच करा, अशी मागणी केली. यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जलील यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
राज्य सरकारने बकरी ईदच्या निमित्ताने प्रतिकात्मक कुर्बानी द्यावी असे आदेश दिले आहेत. या आदेशाला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला असून 5 तारखेच्या राम मंदिरांचे भूमिपूजनही पंतप्रधानांनी प्रतिकात्मकच करावे अशी मागणी केली. यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी तिखट टीका करत, 'कोण तो जलील? असा प्रतिप्रश्न केला. खैरे म्हणाले, 'तो छटाक आतपाव माणूस आहे. त्याला फटके पडल्यावर कळेल.' अशा खरमरीत शब्दात खैरेंनी जलील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. खासदार जलील आणि खैरे यांच्या शाब्दिक हल्ल्यांनी राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि एमआयमध्ये जुंपल्याच पाहायला मिळत आहे.
सर्वच धार्मिक स्थळे उघडली पाहिजेत, बकरी ईद आणि श्रावण या सणांच्या निमित्ताने एक बैठक घेत खासदार जलील यांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना निवेदन दिले होते. मात्र ईदसाठी बकऱ्यांची ऑनलाईन खरेदी करता येईल असे सरकारतर्फे सांगण्यात आले. मात्र, आॅनलाईमध्ये लहान शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार नाही. गाव, खेड्यातील प्रत्येकाकडे स्मार्ट फोन नाहीत. दिल्ली - मुंबईत बसून निर्णय घेणाऱ्यांकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत, मात्र समाजातील शेवटच्या घटकाकडे त्याची वाणवा आहे, असे खासदार जलील म्हणाले.