औरंगाबाद - कंगना रणौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा केलेला एकेरी उल्लेख आणि खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका चुकीची आहे. या वक्तव्यामुळे तिची मानसिकता दिसून येत असल्याचे मत एमआयएम प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.
सध्या कंगना रणौत आणि शिवसेना वाद चांगलाच चर्चेला आहे. काल मुंबई महानगरपालिकेने कंगना रणौतच्या मुंबईतील कार्यालयावर कारवाई केली. त्यानंतर मुंबईत दाखल झालेल्या कंगनाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने टीका केली. उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख असले तरी ते राज्याचे प्रमुख आहेत, याचे भान ठेवायला हवे होते, अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली.
उद्धव ठाकरे हे कोणत्या एका पक्षाचे मुख्यमंत्री नाहीत. राज्यातील प्रत्येक नागरिकाचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अशा भाषेत टिका करणे चुकीचे आहे. एमआयएम आणि शिवसेनेचे वैचारिक मतभेद आहेत मात्र, तरीही ते आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा आम्ही मान ठेवतो. शिवसेनेसोबत आमचे राजकीय वाद असले तरी जे चुकीचे झाले आहे त्याला आम्ही चुकीचेच म्हणणार, अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी मांडली.