औरंगाबाद - वंचितसोबत अजूनही आघाडीची आशा जिवंत आहे. प्रकाश आंबेडकरांनी याबाबत ओवेसींना विनंती केली पाहजे, असे वक्तव्य एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये केले.
हेही वाचा - आघाडीसाठी आम्ही दरवाजे बंद केले नाहीत - प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांचा मी आदर करतो, ते माझे मोठे भाऊ आहेत. मात्र, जागावाटपाबाबत त्यांना माझ्यासोबत बोलायचे नव्हते. त्यांनी माझे काय चुकले हे सांगावे, मी त्यांची जाहीर माफी मागतो. मात्र, तसे होत नाही, असे जलील यांनी सांगितले.
हेही वाचा - शिवसेनेला अर्ध्या जागा मिळाल्या नाही तर युती तुटेल - खासदार संजय राऊत
वंचित बहुजन आघाडीबाबत बोलताना, आम्हाला अजूनही आशा आहे की आम्ही आणि वंचितने सोबत राहावे. यावर्षी चांगली संधी चालून आली आहे. वंचित आणि एमआयएमसोबत लढले तर सर्वच पक्षाच्या बड्या नेत्यांना मोठा धक्का बसू शकतो. बोलणी करायला आम्ही आजही तयार आहोत. मात्र, त्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी ओवेसी साहेबांना फोन करायला हवा, असे जलील म्हणाले.
तसेच ओवेसी हे हैदराबादवरून पुण्याला चर्चेसाठी आले होते. त्यामुळे आता आंबेडकरांनी हैदराबादला जाऊन बोलणी केली पाहिजे. कुठल्याही परिस्थिती आम्हाला 8 जागा मंजूर नाहीत, असा पुनरुच्चार देखील जलील यांनी केला. वंचित सोबत युती तोडण्याचे पत्र आम्ही काढले. मात्र, त्याची काही कारणे होती, असे देखील जलील यांनी सांगितले.