छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : बॅंकेकडे एक सुरक्षितता म्हणून बघितले जाते. परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. अनेकांच्या ठेवी मुदत संपल्यानंतरही मिळत नाही, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सहकार विभागाने गैरव्यवहाराचा ठपका ठेवत संचालक मंडळवर गुन्हा दाखल केला आहे. बँकेत कुठलाही विचार न करता वाटलेल्या कर्जामुळे ठेवीदार संतप्त झाले आहे.
बँकेसमोर ग्राहकांची गर्दी : जवळपास ग्राहकांचे 375 कोटी रूपये बँकेत आहेत. 3 हजाराहून अधिक ग्राहकांच्या ठेवी मुदत पूर्ण झाल्या आहेत. तरी अद्याप पैसे मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतर बँकेसमोर ग्राहकांची गर्दी ही वाढत चालली आहे, खासदार इम्तियाज जलील यांनी बँकेत जाऊन जाब विचारला. तेव्हा संचालक अंबादास मानकापे यांनी लवकरच सर्व ग्राहकांचे पैसे मिळतील, असे आश्वासन दिले आहे.
याबाबत पोलिसांना माहिती विचारली असता ते व्यवस्थित उत्तर देत नाही, त्यामुळे सोमवारी फसवल्या गेलेल्या ग्राहकांसोबत क्रांतीचौक ते पोलीस आयुक्तालयापर्यंत निषेध मोर्चा काढणार आहे.- खासदार इम्तियाज जलील
बँकेत शहानिशा न करता कर्ज वाटप : आदर्श नागरिक सहकारी पतसंस्थेची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली. त्यानंतर हळूहळू बँकेचा विस्तार वाढत गेला. बँकेला ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात यश आले. मात्र त्यानंतर संस्थेच्या संचालक मंडळाने कर्ज वाटप करताना कुठलीही पडताळणी न करता पैसे दिल्याचे समोर आले आहे. अनेकांनी तारण ठेवलेच नाही, तर काहीजणांनी कर्जापेक्षा अत्यल्प दराचे तारण ठेवले. त्यात गॅरेंटर देखील अनेकांनी दिले नाहीत, परिणामी कर्जाची रक्कम परत येण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पैसे परत मिळण्यास अडचण : जवळपास 202 कोटी रुपये बँकेने निकटवर्तीय आणि मित्रपरिवारांना कर्ज स्वरूपात वाटले आहेत. आता ते पैसे परत येत नसल्याने अनेक ठेवीदारांच्या ठेवींची मुदत पूर्ण झाली असली तरी अद्याप त्यांना हक्काचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांनी अनेक तक्रारी सहकार विभागाकडे केल्या आहेत. त्यानंतर बँकेची तपासणी करून, 11 जुलै रोजी बँकेच्या संचालक मंडळांसह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासदार जलील काढणार मोर्चा : खासदार इम्तियाज जलील यांनी बँकेसमोर असलेल्या ग्राहकांसह अधिकाऱ्यांना जाब विचारला. इतकेच नाही तर शहरात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड तसेच राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे असताना नागरिकांना ही अडचण सहन करावी लागते हे संतापजनक आहे, असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले आहेत. यावेळी बँकेची झाडाझडती घेण्यात आली आहे. त्यातील काही महत्त्वाचे दस्तावेज, कंम्प्युटर, हार्ड डिस्क ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा :