औरंगाबाद - सिल्लोड तालुक्यात विनापरवाना पिस्तुले विक्रीसाठी नेत असताना एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जाळ्यात पकडले. त्याच्याकडून तीन गावठी कट्टे तसेच अकरा जिवंत काडतुसे व दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. या मुद्देमालाची एकूण किंमत दोन लाख तीन हजार आहे. संतराम उर्फ संतोष अंकुश सावंत(वय-36) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संबंधित कारवाई बुधवारी (19 फेब्रुवारी) दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास औरंगाबाद- जळगाव महामार्गावरील डोंगरगाव फाट्याजवळ करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शिव जयंतीनिमित्त स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, पोलीस कर्मचारी सुधाकर दौड, गणेश मुळे हे अन्य कर्मचाऱ्यांसह गस्तीवर होते. यावेळी पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांना संबंधित घटनेविषयी गुप्त माहिती मिळाली. ही माहिती गस्तीवरील अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी सापळा रचला; आणि आरोपीकडे विचारपूस केली. यानंतर झडती घेतल्यावर त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत गावठी पिस्तुले आणि काडतुसे सापडली. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक विकास आडे पुढील तपास करत आहे.
आरोपी अट्टल गुन्हेगार
संतोष अंकुश सावंत याच्यावर लातूरमध्ये खून, दरोडा तसेच पुण्यात आर्म अॅक्टखाली गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याचा शोधात होते. परंतु, तो फरार होता. संबंधित घटनेनंतर चौकशीदरम्यान त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.