औरंगाबाद - राज्यात युतीचे गणित बिघडल्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिसून येत आहे. 'वेळ आली तर महापालिकेतील शिवसेनेचा पाठिंबा काढू', असा इशारा आमदार अतुल सावे यांनी दिला आहे.
राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारने अनेक योजनांना स्थगिती दिली आहे. ज्यामध्ये शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या 1 हजार 680 कोटींच्या योजनेचादेखील समावेश आहे. याविषयी टीका करताना अतुल सावे म्हणाले,'मंत्रिपद मिळाल्यानंतर मी चार महिने सलग पाठलाग करून पाणी योजना मंजूर करून घेतली होती. शहराचा पाणीप्रश्न गंभीर आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना लोकसभा निवडणुकीत पाणी प्रश्नामुळे हार पत्करावी लागली होती. याच पाणीप्रश्नावरून भाजप नगरसेवक विजय औताडे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला आहे. वेळ आली तर महानगर पालिकेत शिवसेनेला दिलेला पाठिंबादेखील काढून घेऊ'
हेही वाचा - 'या' कारणामुळे राज्यात औरंगाबादकर भरत आहेत सर्वाधिक पाणीपट्टी!
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवक विजय औताडे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला. त्यावरून महानगरपालिकेत शिवसेना विरुद्ध भाजप अशा संघर्षाला सुरुवात झाली आहे. पाण्याच्या मुद्द्यावरून हा संघर्ष सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.