औरंगाबाद - मराठा आरक्षण आंदोलनात आत्महत्या करणाऱ्या युवकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसह सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना ज्या दिवशी आर्थिक मदत मिळेल, त्या दिवशी आम्ही आनंद साजरा करू आणि सरकारचे धन्यवाद मानू अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी घेतली आहे.
आतापर्यंत सरकारने अनेक आश्वासन दिले मात्र ते पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे आतापर्यंतचे अनुभव लक्षात घेता आता जोपर्यंत बलिदान देणाऱ्या युवकांच्या कुटुंबियांना प्रत्यक्षात मदत मिळणार नाही तोपर्यंत सरकारचे अभिनंदन कोणी करू नका असे आवाहन त्यांनी केले.
ही वाचा - वैद्यकीयसह दंत अभ्यासक्रमासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती
आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या युवकांच्या कुटुंबियांना जाहीर केलेली मदत देण्याच्या मागणीसाठी औरंगाबादच्या क्रांतिचौकात आठ ऑगस्टला आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. 10 ऑगस्टला मात्र पोलिसांनी आंदोलकांना अटक करत आंदोलन उधळून लावले होते. त्यानंतर मराठा क्रांतीमोर्चा समन्वयकांनी मुख्यमंत्र्यांना मागण्या मान्य करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी दिला होता. मागण्या मान्य न झाल्यास मातोश्रीसमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान, बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना दहा लाखांची आर्थिक मदत आणि एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाबद्दल सरकारचे अभिनंदन करणार नाही. कारण याआधी अनेकवेळा सरकारने आश्वासन दिले आहेत मात्र ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे आता आधी आश्वासन पूर्ण करा त्यानंतर मातोश्रीवर आम्ही आनंदोत्सव साजरा करू अशी भूमिका मराठा क्रांतीमोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील आणि आप्पासाहेब कुढेकर यांनी मांडली. तर सरकारने आश्वासन पाळल्यानतंर राज्यभरात अभिनंदनाचे पोस्टर लावू असे मत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केले.