औरंगाबाद - एका २३ वर्षीय विवाहितेला पतीने घरातील मंडळीच्या मदतीने बळजबरीने अॅसिड पाजल्याची घटना पुंडलिकनगरमध्ये घडली. यामध्ये आरोपी पतीला त्याच्या घरातील ६ मंडळीने मदत केल्याची उघड झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे.
पुंडलिकनगरमध्ये २३ वर्षीय पीडित विवाहिता विद्या जाधव पती बाळू जाधव याच्यासोबत राहते. तिला दोन मुली आहेत. त्या दोघात किरकोळ कारणावरुन भांडण होत होती. ३ मार्चला पती बाळू याने सासू पुष्पाबाई, सासरा उत्तम जाधव, तसेच माया जाधव, सुनिल जाधव, वंदना राठोड, दिनेश राठोड या सहा जणाच्या मदतीने पत्नी विद्या हिला ठार मारण्याच्या उद्देशाने बळजबरीने अॅसिड पाजले.
त्यानंतर पीडितेला तेथेच सोडून पतीने पळ काढला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी बाळू याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.