औरंगाबाद - कौटुंबिक कलहातून झालेल्या वादानंतर पतीने पत्नीची गळा आवळून निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर, महिलेचे हात-पाय बांधून मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये टाकून पसार झाला. ही घटना शहरातील आरेफ कॉलनीत घडली असून पोलिसांनी सिल्लोडमधून पसार झालेल्या पतीच्या मुसक्या आवळल्या आहेत. रत्ना पंडित बिरारे (४५) असे मृत महिलेचे नाव आहे.
या पती-पत्नीमध्ये नेहमीच कौटुंबिक कारणावरून वाद होत होते. गुरूवारी सायंकाळी रत्ना ही टाऊनहॉल परिसरात असलेल्या माहेरी गेली होती, त्यावेळी बिरारे हा देखील तिच्यासोबत होता. त्यांनतर गेल्या, २ दिवसापासून रत्ना कामाला आली नव्हती. तसेच शनिवारी सकाळपासून बंगल्याच्या आवारातून कुजलेला वास येत असल्याने इकरार शेख यांनी वास येत असलेल्या ठिकाणी जावून बघितले. यावेळी, पाण्याच्या ड्रममध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्यांना रत्ना दिसून आली.
हेही वाचा - चोरीचा आरोप झाल्याने 12 वर्षीय मुलाची आत्महत्या
शेख यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना आणि रत्नाच्या नातेवाईकांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बेशुध्दावस्थेत असलेल्या रत्नाला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषीत केले. याप्रकरणी रत्नाचा भाऊ विजय जोगदंड याने पंडित बिरारे विरूध्द बेगमपुरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर फरार झालेल्या बिरारेचा शोध घेत असताना खबर्याने पोलीस निरीक्षक सानप यांना तो सिल्लोडला लपून असल्याचे सांगितले. तसेच ज्या दांडगेनामक व्यक्तीकडे बिरारे थांबला होता त्यांचा मोबाईल नंबर पोलीस निरीक्षक सानप यांना दिला.
हेही वाचा - कन्नड विधानसभा मतदार संघात हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा द्या - इम्तियाज जलील
सानप यांनी पी.एस.आय. देवकाते यांच्या सोबत पथक देऊन ताबडतोब सिल्लोडला पाठवले. दरम्यान दांडगेंना सतत फोन येत असल्यामुळे बिरारे घाबरून घराच्या बाहेर पडला. मात्र, पोलीस निरीक्षक सानप यांनी सिल्लोड पोलिसांच्या मदतीने त्याला जेरबंद केले. या घटनेसंदर्भात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बहुरे करत आहेत.
हेही वाचा - प्रचारसभा झाल्यावर ओवेसी यांनी केले नृत्य