औरंगाबाद - जिल्ह्यातील होर्डिंग धोकादायक बनले आहेत. जालना रोडवरील भव्यदिव्य असलेले होर्डिंग पहिल्याच पावसात पत्त्याच्या महालासारखे कोसळले. त्यामुळे होर्डिंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर येणाऱ्या काळात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जाहिरातीचे होर्डिंग लावून मोठी रक्कम कमवण्यासाठी अनेक जण आपल्या इमारत, हॉटेलच्या गच्चीवर लोखंडी फ्रेम बसवतात. मात्र, याची परवानगी घेणे आवश्यक असताना सुरक्षेची कुठलीही काळजी न घेता अनेक जण परवानगी न घेताच होर्डिंग लावतात.
रविवारी पहिल्या पावसाच्या सरी औरंगाबाद जिल्ह्यात पडल्या. त्यापूर्वी सोसाट्याचा वारा सुरू होता. याच वाऱ्यामध्ये जालना रोडवरील भलेमोठे होर्डिंग पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळल्याचे पाहायला मिळाले. अशीच दुसरी घटना वैजापूर शहरातदेखील घडली. यात सुदैवाने खाली कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, शहरात अजूनही हजारो होर्डिंग लागलेली आहेत. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिक सांगतात.