औरंगाबाद - मध्यरात्री जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस परिसरात कोसळला. अवघ्या काही वेळात पडलेला हा पाऊस विक्रमी असून मागील महिन्याभरात तिसऱ्यांदा असा पाऊस पडल्याचे मत हवामान तज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले.
शुक्रवार सायंकाळ पासून पावसाला पुन्हा सुरुवात -
1 ऑक्टोबर शुक्रवार दुपारपर्यंत दिवसभर कडक ऊन होते. मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली. गंगापूर तालुक्यासह वैजापूर आणि शहरात मेघगर्जनेसह तासभर पावसाने जोर धरला. चक्रीवादळाने निर्माण केलेली वातावरण निर्मिती, परतीचा पाऊस यामुळे शहरावरील वातावरण बदलाचा एकत्रित परिणाम म्हणून पहाटे जोरदार पाऊस बरसला. यामुळे 2 ऑक्टोबर पहाटे 03:25 वाजता हलक्या पावसाला सुरुवात झाली. यानंतर मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. जवळपास पंचवीस मिनिटात विजांचा कडकडाटासह सरासरी 118 मिलीलीटर प्रतितास या वेगाने पाऊस पडला.
ढगफुटी सदृश्य झाला पाऊस -
शहरातील एमजीएम जेएनईसी वेधशाळेत या पंचवीस मिनीटात 51.2 मिमी पावसाची नोंद झाली. नंतर पावसाचा जोर कमी झाला. पहाटे तीननंतर 05:35 जवळपास दोन तासात शहरावर 78.2 मिमी पावसाची नोंद झाली. या वर्षी प्रथमच शहरावर गेल्या एका महिन्यात तीन वेळेस ढगफुटीच्या वेगाने पावसाने हजेरी लावली आहे. अशी माहिती हवामाना तज्ञ आणि एमजीएम जेएनईसी वेधशाळेचे डॉ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.
सुखाना नदीला पूर, एक जण गेला वाहून -
औरंगाबाद तालुक्यातून वाहणाऱ्या सुखाना नदीला पूर आला. या पुरात चिकलठाणा परिसरात एक व्यक्ती वाहून गेल्याच समोर आलं. त्याबाबत एक व्हिडिओ शनिवारी चांगलाच व्हायरल झाला असून त्या इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचा शोध घेतला जात आहे. तर नदी काठच्या अनेक सखोल भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये पिसादेवी, नारेगाव भागात पाणी वाढल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठं नुकसान सहन कराव लागलं आहे.