औरंगाबाद - रविवारी औरंगाबादमध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारच्या सुमारास अनेक ठिकाणी अचानक पावसाला सुरुवात झाली. विजेचा कडकडाट, सुसाट वारा यामुळे वातावरणात बदल झाला. काही ठिकाणी तर गारांचा मारादेखील झाला. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. विशेषतः फळबागांचे नुकसान झाले. गारा कोसळल्याने फळांवर जोराचा मारा बसल्याने हे नुकसान झाले आहे.
उन्हाळा असल्याने पारा गेल्या काही दिवसांपासून चढलेला होता. त्यामुळे उष्णता मोठ्या प्रमाणात जाणवत होती. दुपारी कडकडीत ऊन असताना अचानक सुसाट वारे वाहू लागले आणि क्षणात पावसाला सुरुवात झाली. काही मिनिटात पावसामध्ये गारांचा मारा सुरू झाला. अवकाळी पावसाने वातावरणात मोठा बदल झाला, उष्ण असलेले वातावरण थंड झाले. उष्णता कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असला तरी फळबागांचे, भाजीपाल्याचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्री आणि सोमवारीदेखील काही भागात पाऊस कोसळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.