औरंगाबाद - कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेकांची उपासमार होत आहे. त्यात घरातील कर्ता व्यक्तीच कारागृहात शिक्षा भोगत असेल तर, त्यांच्यावरची परिस्थीती ही आभाळच कोसळल्या सारखी आहे. मात्र, अशा परिस्थितीत कारागृहाच्या वतीने अशा कुटुंबाना धान्य वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कारागृहात एखादी व्यक्ती शिक्षा भोगते त्यावेळी त्याची मानसिक स्थिती अनेकवेळा खराब होते. त्याला बऱ्याचवेळा आपल्या कुटुंबाची चिंता असते. त्यातूनच अनेकवेळा ते त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीपासून तो परावृत्त होत नाही. त्यामुळे हलाकीची परिस्थिती असणाऱ्या 50 कैद्यांच्या कुटुंबियांना हर्सूल कारागृहातर्फे अन्न धान्याचे वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे सर्वत्र कामकाज बंद असल्याने अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. त्यात कारागृहात कैदी असणाऱ्या अनेक कैद्यांच्या कुटुंबियांचे हाल होत आहेत. अनेक संघटना गरजूंना मदतीसाठी पुढे आल्या असल्या तरी अनेकांना अद्याप मदत मिळालेली नाही. त्यामुळे कारागृहात बंदिस्त असलेल्या गरजू कैद्यांच्या घरी खाद्यपदार्थ देण्याचे काम हर्सूल कारागृहाच्या वतीने करण्यात आले. तर, सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गहू, तांदूळ, डाळ, तेल असे साहित्य जिल्ह्यातील 50 गरजू कैद्यांच्या घरी नेऊन देण्यात आले.
या परिस्थितीमुळे कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या मानसिक स्थिती चांगली राहण्यास मदत होईल आणि कुटुंबाला लॉकडाऊनच्या काळात उदरनिर्वाह करण्यास मदत होईल, असा विश्वास कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.