औरंगाबाद - महानगरपालिका निवडणूक जवळ आली असताना औरंगाबादचे नाव बदलण्यावरून राजकारण तापत चाललं आहे. शिवसेना-भाजपमध्ये संभाजीनगरच्या मुद्यावरून जुंपली असताना, त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहराचे नाव बदलण्यासाठी शिवसेना नुसत्या घोषणा करत आहे. 2 महिन्यात शिवसेनेने शहराचे नाव बदललं नाही तर पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी मतदारांना मत मागू नये, अशी टीका माजी आमदार आणि मनसेत नुकतेच दाखल झालेले हर्षवर्धन जाधव यांनी केली.
गेल्या ३० वर्षांपासून शिवसेना प्रत्येक निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर करण्याच्या घोषणा देते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली ही घोषणा आहे. मात्र, इतक्या वर्षात शहराचे नाव बदलू शकते नाहीत. निवडणूक आली की तोच मुद्दा घ्यायचा आणि मतदारांसमोर जायचे. निर्णय मात्र झाला नाही. महानगर पालिका निवडणुकीला २ महिने बाकी आहेत. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी आता शहराचे नाव बदलावं. जर त्यांना नाव बदलायचं नसेल तर यापुढे त्यांनी मतदारांना मत मागू नये. त्यांना तो अधिकार नाही अशी टीका मनसे नेते हर्षवर्धन जाधव यांनी केली.