कन्नड (औरंगाबाद)- राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर मी कोचीन येथे जाणार होतो. परंतु, कोरोनामुळे मला पिशोर येथे राहण्यास यावे लागले. माझी आई यापूर्वीच पिशोर येथे राहण्यास आलेली आहे. कदाचित या निर्णयामुळे मी पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहे असे काही लोकांना वाटेल. परंतु, मी पुन्हा राजकारणात परतणार नाही, असे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन जाधव हे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. यामध्ये अनेक बाबींचा त्यांनी खुलासा केलेला आहे. यात ते राजकारणातून निवृत्त होत असल्याचे त्यांनी पूर्वीही सांगितले होते. कदाचित कन्नड तालुक्यात पिशोर येथे राहायला आल्यानंतर काही राजकीय मंडळींना असे वाटू शकते की, मी पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहे. परंतु, मी राजकारणापासून पूर्णपणे स्वतःला बाजूला ठेवले आहे. यानंतर मी कुठलीही निवडणूक लढविणार नाही.
माझ्यापासून राजकीय फायदा होईल म्हणून कोणी माझ्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न करु नका. परंतु, माझ्या आमदारकीच्या अनुभवाचा कोणाला फायदा होत असेल, समाजासाठी उपयोग होत असेल. तर सामाजिक कार्यात मी सर्वतोपरी मदत करेल.
मध्यंतरी मला खूप नैराश्य आले होते. मी आत्महत्याच्या निर्णयापर्यंत सुद्धा पोहोचलो होतो. परंतु, मी त्यातून आताच सावरलो आहे. प्रत्येकाचे खाजगी व व्यावसायिक आयुष्य वेगवेगळे असते. येणाऱ्या काळात संजना जाधव यांच्या पाठीशी माझ्या मतदारांनी उभे राहावे, असे आवाहनही हर्षवर्धन जाधव यांनी केले. यावेळी त्यांचा मुलगा आदित्य सुद्धा उपस्थित होता.