वैजापूर (औरंगाबाद) - औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गौण खनिज संपत्तीची चोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे यावर आता प्रशासनाने जालीम उपाय शोधून काढला असून, आता वाळू आणि गौणखनिज तस्करांवर लक्ष ठेवण्यासाठी चक्क ड्रोनचा वापर केला जाणार आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात ड्रोन पथकाकडून प्रत्यक्षात कारवाईला सुरवात करण्यात आली आहे.
गौणखनिज तस्करांवर नजर -
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर आणि पैठण परिसरात गोदावरी नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात अवैध मार्गे वाळू उपसा केला जातो. तसेच काही भागात मुरुम, मातीसह गौणखनिजावर तस्करांची नजर असते. मात्र क्षेत्र मोठे असल्याने बऱ्याच वेळा महसूल पथकाला वाळू व गौणखनिज उत्खनन कुठे सुरु आहे. याचा अंदाज येत नाही. त्यामुळे आता ड्रोनच्या माध्यमातून अशा वाळू व गौणखनिज तस्करांवर नजर ठेवता येणार आहे.
पुरावा राहणार उपलब्ध -
बऱ्याचवेळा महसूल किंवा पोलीस पथक कारवाईसाठी आल्याची भनक लागल्याने हे माफिया पळून जातात, तसेच नंतर त्यांची ओळख पटवणे सुद्धा अवघड जाते. मात्र आता थेट ड्रोनच्या माध्यमातून वाळू तस्कर कॅमरामध्ये कैद होतील. त्यामुळे पळून गेल्यानंतरही तस्करांची ओळख पटल्याने त्यांच्यावर त्या पुरावांच्या आधारे कारवाई करता येणार आहे.
वाळू माफियांमध्ये खळबळ -
ड्रोनचा सर्वाधिक फायदा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी होणार आहे. कारण बऱ्याचवेळा पथक कारवाईसाठी आल्याची माहिती लोकेशनवर असलेल्या पंटरकडून माफियांना मिळून जाते. मात्र आता एका जागेवर थांबवून महसूल पथक ड्रोनच्या माध्यमातून अनेक भागावर लक्ष ठेवणार असल्याने, वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - Ahmednagar Car Accident : भीषण कार अपघातात तीन मित्रांवर काळाचा घाला