पैठण (औरंगाबाद)- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने यंदा आषाढी वारीचा पायी सोहळा रद्द केला आहे. केवळ सातच मानाच्या दिंड्यांना आषाढी वारीसाठी पंढरपुरात प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला आहे. शासनाने असे न करता पारंपारिक दिंड्यांना देखील पंढरपुरात दर्शनाला वेळ द्यावा, अशी मागणी संत एकनाथ महाराज वंशस्थ तथा कुलत्पन्न पालखी प्रमुख ह.भ.प. विनित महाराज गोसावी यांनी पत्रकार परिषदेत शासनाकडे केली आहे.
आमची नाथवंशस्थाची पालखी परंपरेप्रमाणे पायी पंढरपूरकडे जात असते. यंदा कोरोना महामारीचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने पायी दिंडी सोहळे रद्द केलेले आहेत. केवळ सातच मानाच्या पालख्यांना पंढरपुरात प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय पारंपारिक पालख्यांवर अन्याय करणारा आहे, असे विनित महाराज गोसावी म्हणाले आहेत.
नाथांचे आजोबा भानुदास महाराज यांनी पांडुरंगाला कर्नाटकाहून पंढरपुरात आणलेले आहे. आज त्यांच्या वंशजांच्या म्हणजेच संत एकनाथ महाराज कुलत्पन्न पालखीलाच पंढरपुरात प्रवेश नसावा हे अन्यायकारक आहे,असे विनित महाराज यांनी म्हटले आहे.
आमच्या पालखीला आषाढी एकादशीला नाहीतर किमान भानुदास चतुर्थीला तरी पंढरपुरात पुजेला वाहनाद्वारे जाऊ द्यावे, अशी मागणी देखील गोसावी यांनी केलीय. यावेळी संत एकनाथ महाराज कुलत्पन्न पालखीचे मार्गदर्शक छय्या महाराज गोसावी आणि वारकरी उपस्थित होते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमधे मे महिन्याच्या अखेरीस पुण्यात झालेल्या बैठकीत पायी वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आळंदी आणि देहूवरून निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एस टी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्याबाबत चर्चा झाली होती.