औरंगाबाद - पोलीस खात्यात भरती होण्यासाठी मैदानी सराव करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरून डोंगरावरून १०० फुट खोलीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. ही घटना तासगाव येथील खवड्या डोंगरावर घडली असून यामुळे तिचे पोलीस होण्याचे स्वप्न अर्धवटच राहिल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुनीता देविदास शेळके (वय-२१, रा.रांजणगाव शेनपुंजी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
सुनीताच्या वडिलांचे २ वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी भाऊ भीमरावने उचलली होती. सुनीताचे पोलीस व्हायचे स्वप्न होते. पोलीस होऊन घराच्या हालाखीच्या परिस्थितीतून परिवाराची सुटका करायचे. त्यामुळे ६ दिवसांपूर्वी ती नांदेडहुन आल्यानंतर लहान बहीण शिल्पा आणि मावस भाऊ रामेश्वर गिरी यांच्यासोबत रोज पहाटे मैदानी सरावासाठी जात होती.
हेही वाचा - औरंगाबादेत पाणीप्रश्न पेटला, महापालिकेत सेना-भाजप आमने सामने
दररोजप्रमाणे आज सकाळी तिघांनीही सराव केला व खाली आले. त्यानंतर शिल्पा आणि सुनीता या दोघी पुन्हा डोंगरावर धावण्यासाठी गेल्या. मात्र, धावताना सुनिताचा पाय घसरला आणि ती खवड्या डोंगरावरून १०० फुट खाली डोक्यावर पडली. तिच्या डोक्यावर गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव झाला. उपस्थितांनी सुनीताला तातडीने शासकीय १०८ रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून सुनीताला मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
काही दिवसांपूर्वीच सुनिताच्या जिवलग मैत्रीनीने केली होती आत्महत्या
सुनीता नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एका महाविद्यालयात बी.ए.च्या द्वितीय वर्षात शिकत होती. तेथेच ती एका वसतिगृहात राहायची. तिच्या जिवलग वर्ग मैत्रिणीने काही दिवसापूर्वीच अकस्मातपणे आत्महत्या केली. तेव्हापासून तिचे वसतिगृहात मन लागत नसल्याचे तसे तिने भावाला सांगितले होते. काही दिवसानंतर तिची परीक्षा होती त्यामुळे आई-भावाकडे राहून अभ्यास करण्यासाठी ६ दिवसांपूर्वीच ती नांदेडहुन रांजणगावात आली होती. सुनीताच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - कन्नड़ येथे आजारांची लाट, मात्र रुग्णालयंच पाहतंय औषधांची वाट