औरंगाबाद - आज आपण महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती साजरी करीत आहोत; मात्र मध्यप्रदेशच्या रेवा येथील महात्मा गांधी यांच्या अस्थी गांधी जयंतीदिनाच्या दिवशीच चोरीस गेल्या. माझ्या आजोबांच्या अस्थी तरी आम्हाला द्या'', अशी भावनिक मागणी गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. तुषार गांधी एका कार्यक्रमानिमित्त शहरात आले होते.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये काँग्रेसला झटका; पश्चिम मतदारसंघातील उमेदवार रमेश गायकवाडांचा अर्ज बाद
कॉंग्रेस असो वा भाजप दोन्ही पक्षांनी आपल्या सोईनुसार महात्मा गांधीजींचा वापर करून घेतला आहे. देशातील परिस्थिती पाहता आता या देशाला नवीन राष्ट्रपिता मिळाला, असेही दाखविले जात आहे. त्याचबरोबर गांधीजींच्या प्रतिमेची विटंबना करून त्यावर "गद्दार' असे लिहिण्यात आले. या घटनेला तीन दिवस पूर्ण होत आले. तरीही मध्यप्रदेश सरकार, केंद्र सरकारकडून समाजकंटकांवर कोणतीही कारवाई केली गेली नाही; एवढेच नाही तर साधी प्रतिक्रियाही दिली गेली नाही. त्यामुळे गांधीजींच्या नावावर राजकारण करू पाहणाऱ्यांना आता गांधीची अवहेलना कशी सहन होत आहे. गांधीजींच्या मारेकऱ्यांचे समर्थन करणाऱ्यांनीच हा प्रकार घडवून आणला असावा, अशी शंकाही तुषार गांधी यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - बसपाच्या संपर्क प्रमुखाला इच्छुकांची मारहाण; तिकीट वाटपात पैसे घेतल्याने वाद
साबरमती आश्रम (गुजरात) येथील 36 एकर जमिनीवर सरकारचा डोळा आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांना घर खाली करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. गांधीजींचे स्मरण करून देणाऱ्या सर्व वस्तूही सरकार जप्त करू पाहत आहे. त्याही पलीकडे देशभरातील गांधीजींच्या विचाराने चालणाऱ्या संस्थावर घाला घालण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. एका प्रकारे गांधी विचार संपविण्याचा घाट घातला जातोय, परंतु असे होणार नाही. येथे लोकशाही असून गांधी विचारांच्या लोकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन तुषार गांधी यांनी केले.