सिल्लोड (औरंगाबाद) - देशात कोरोनाचा कहर सुरू झाल्याने सर्वत्र टाळेबंदी लागू करण्यात आली. यामुळे बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये बंद करण्यात आली. या दरम्यान सर्वसामान्य जनतेचे अतोनात हाल झाले, अनेकांचे काम धंदे बंद पडल्याने एक वेळच्या जेवणाची चिंता असताना शासनाने ऑनलाइन शिक्षण देण्याचे आदेश शाळा महाविद्यालयांना दिले होते. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्मार्टफोनची आवशकता होती. एक वेळच्या जेवणासाठी गोर गरिबांचे हाल होत असताना महागडा मोबाईल कसा आणणार अशा विवंचनेत पालक वर्ग होता. मोबाईल नसल्याने शिक्षण बुडत असल्याने गरीबाच्या मुलाचे शैक्षणिक नुकसान होत होते, अशा परीस्थितीत सिल्लोड येथील सर्वंसामान्य घरातील दोन जावा समोर आल्या आहे.
सिल्लोड येथील प्रिया विशाल आरसूड व पूजा विक्रम आरसूड दोघी नात्याने जावा आहेत. त्यांच्या कुटुंबाची सेवाभावी वृत्ती परिसरात सर्वश्रूत आहे. अशा सेवाभावी कुटुंबातील पदवीधर महिलांनी समाजातील गोर गरीब जनतेच्या गरिबीची जाण ठेवत ज्या मुलांकडे स्मार्टफोन नाहीत अशा 25 ते 30 मुलांना एकत्र आणत त्यांच्या-त्यांच्या अभ्यासक्रमानुसार शिकवायला सुरुवात केली. दिवसागणिक मुलांना त्यांच्या शिकवण्याची गोडी लागायला लागली.
दोघी जावांना शिकविण्याची गोडी
आजच्या कोरोनाच्या संकटात व महागाईच्या युगात सर्वसामान्यांचे जीवन अगदी असहाय्य झाले असताना, सिल्लोड शहरातील दोन जावा मात्र गरिबांच्या मुलांसाठी आपल्या घरातील जबाबदाऱ्या सांभाळत दररोज आपला वेळ गरिबांच्या मुलांना शिकविण्यासाठी देऊ लागल्या. या दोघी जावांच्या शिकविण्याची गोडी या मुलांना चांगलीच लागल्याचे काही मुलींनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले आहे. या दोघी जावांच्या सेवाभावी वृत्तीची दखल घेऊन त्याच्या कुटुंबातील पुरुषमंडळीही त्यांना प्रोत्साहित करत त्यांना शिकविण्याचा कार्यात लागेल ती मदत करू लागले आहेत. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना पहावयास मिळत असून आपल्या कर्तृत्वाने महिलांनी विविध क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे.