औरंगाबाद - वैजापूर तालुक्यात धुमाकूळ घालत घरफोडी केलल्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी चार मोबाईल, दुचाकी हस्तगत केली आहे. मात्र, पावणेदोन लाखांची रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या चौकडीवर नाशिक व जळगाव जिल्ह्यांमध्ये देखील गुन्हे दाखल आहेत.
शिऊर येथील सिताराम गमराज निपटे (वय 50 वर्षे, रा. वडजी, ता. वैजापूर) हे 28 जुलैला रात्री दहाच्या सुमारास झोपी गेले होते. त्यानंतर चोराने त्यांच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर निपटे यांच्या घरातून अडीच लाखांची रोकड लांबवली. तसेच कारभारी बिडाईत, त्रिंबक निपटे यांचे मोबाईल व ज्ञानेश्वर निपटे यांची अकरा हजाराची रोकड लांबवली. याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सराईत गुन्हेगारांचा तांत्रिकदृष्ट्या शोध घेतला.
त्यानंतर दोन वेगवेगळे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले. या पथकांनी कोपरगाव व अहमदनगर भागात गुन्हेगारांची माहिती घेतली. त्यावेळी सोन्या पिता संसार उर्फ अशोक भोसले उर्फ कर्डिले ( वय 25 वर्षे) व मायकल शिवराम चव्हाण उर्फ दुर्गेश रवि भोसले (वय 20 वर्षे, दोघे रा. विखे रुग्णालयाच्या पाठीमागे, नागापूर, ता. जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे विचारपूस केली. तेव्हा त्यांनी साथीदार मल्ल्या उर्फ मनोहर लहानू मोरे (वय 24 वर्षे) व बबन लहाणू मोरे (वय 27 वर्षे, दोघे रा. पारळा, ता. वैजापूर) यांच्यासोबत घरे फोडल्याची कबुली दिली. त्यावरुन पोलिसांनी दोघांनाही अटक करुन चार मोबाईल व दुचाकी जप्त केली. या चौकडीने मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागातील वडजी, पारळा, भडजी, खरज तसेच नाशिक जिल्ह्यातील भारम, राहेडी व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव भागात घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.