औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन असताना अनेक लोक अनावश्यक बाहेर फिरताना दिसून येतात. त्यामुळे,देशाचे रक्षण केलेले माजी सैनिक आता लोकांना जागृत करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. अनावश्यक फिरणाऱ्या लोकांना घरी पाठवण्यासाठी पिसादेवी येथे माजी सैनिकांनी पुढाकार घेतला आहे.
पिसादेवी परिसरात राहणाऱ्या जवळपास 20 माजी सैनिकांचे एक पथक ग्रामपंचायततर्फे तयार करण्यात आले आहे. हे पथक सकाळी प्रभातफेरीसाठी येणाऱ्या लोकांसह अनावश्यक रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना घरीच राहण्याचे आवाहन करत आहे. देशात लॉकडाऊन असला तरी काहीजण काही कारण काढून रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची संख्या बरीच असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात तर परिसर मोठा असल्याने पोलिसांना गस्त घालणे थोडे अवघड होते. यावर पर्याय म्हणून पिसादेवी ग्रामपंचायत आणि चिकलठाणा पोलिसांनी परिसरात राहणाऱ्या माजी सैनिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. या आवाहनाला परिसरातील जवळपास 20 माजी सैनिकांनी प्रतिसाद दिला. या सर्वांना एकत्र घेत आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून पथक निर्माण करण्यात आले आहे.
पिसादेवी हा परिसर शहराला अगदी जवळ आहे. याठिकाणी अनेक जण सकाळी प्रभातफेरीसाठी येतात. त्यामुळे ऐन लॉकडाऊनच्या काळात सकाळीच बरीच वर्दळ गावात दिसायची. गावातूनच मुख्य रस्ता जात असल्याने अवांतर फिरणाऱ्या लोकांची संख्या वाढत होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती अधिक असल्याने माजी सैनिकांचे पथक निर्माण केले असून या पथकाची मदत घेऊन लोकांना घरीच राहण्याचे आवाहन केले जाणार आहे. हे पथक सकाळी सहा वाजता रस्त्यावर येते. इतकच नाही तर कोरोनाबाबत माहिती देण्याचे काम हे पथक करत आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या प्रत्येकाला मास्क का लावायचा, बाहेर फिरणे किती धोक्याचे आहे. याबाबत जनजागृती हे पथक करत आहे.
माजी सैनिकांसोबत पिसादेवीचे सरपंच अजिनाथ धामणे आणि उपसरपंच भाऊसाहेब काळे रोज सकाळी माईकवर गावकऱ्यांना घरात राहण्याचे आवाहन करतात. तर माजी सैनिकांच्या 4 - 4 च्या तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. या तुकड्या वेगवेगळ्या वेळेत गस्त घालून परिसरात कोणी विनाकारण तर फिरत नाही ना, याकडे लक्ष देत आहे. यामुळे गावात मोठा फरक पडला आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी माजी सैनिकांची मदत घेतल्यास फरक पडेल, असा विश्वास सरपंच अजिनाथ धामणे आणि उपसरपंच भाऊसाहेब काळे यांनी व्यक्त केला आहे. तर सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून काळजी घेतली तर कोरोनाशी सुरू असलेला लढा नक्की जिंकू, असा विश्वास माजी सैनिकांनी व्यक्त केला आहे.