औरंगाबाद - कोरोनाच्या धास्तीने औरंगाबादच्या पैठण येथील नाथषष्टीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढून सोहळा रद्द केल्याचे जाहीर केले. पहिल्यांदाच सोहळा रद्द झाला आहे. त्यामुळे भाविक नाराज झाले आहेत.
सोमवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत धार्मिक सोहळे रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, नाथषष्ठी सोहळा रद्द होणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र, आता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरून सोहळा रद्द केला आहे.
14 मार्च ते 16 मार्च या कालावधीत पैठण येथे नाथषष्ठीचा सोहळा रंगणार होता. या सोहळ्यासाठी दरवर्षी 4 ते 5 लाख भाविक येत असतात. यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने हा सोहळा रद्द करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. सोमवारी नाथषष्ठी विश्वस्त मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते सोहळा रद्द न करण्याची भूमिका घेण्यात आली.
षष्ठीसाठी अनेक पालख्या पैठण येथे दाखल होतात. त्या पालख्या जवळपास 10 ते 12 दिवस आधी निघतात. या पालख्या पैठणच्या हद्दीत दाखल झाल्याने हा सोहळा रद्द करणे शक्य होणार नाही, असे सांगत हा सोहळा रद्द करण्यास विश्वस्तांनी नकार दिला होता. मात्र, भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरत सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेत तस पत्र काढले. त्यामुळे पहिल्यांदाच हा सोहळा रद्द होणार आहे. प्रशासनाच्या भूमिकेनंतर आता भाविक नेमकी काय भूमिका घेतली हे पाहण्यासारखे असणार आहे.