औरंगाबाद - स्वत:च हत्या करून मुलाच्या आत्महत्येचा बनाव करणाऱ्या बापाला पोलिसांनी अटक केली आहे. दीड वर्षानंतर या हत्येचा छडा लावण्यात पुंडलीकनगर पोलिसांना यश आले आहे. ही हत्या कोणत्या कारणाने करण्यात आली होती याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल अशोक जाधव (३०) रा. रेणुकानगर, गारखेडा या तरुणाचा 25 एप्रिल 2018 रोजी मृत्यू झाला होता. राहुलच्या वडिलांनी त्यावेळी राहुलने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र, शवविच्छेदन अहवालात राहुलचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला होता. त्यावरुन पुंडलीकनगर पोलिसांनी तपास केला असता, मुलाच्या आत्महत्येचा बनाव केला असल्याचे समोर आले. या प्रकरणी राहुलचे वडील अशोक सदाशिव जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या प्रकरणात एका महिलेचा हात असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, अद्याप महिलेला अटक करण्यात आली नसून तपास सुरू आहे. तर, तपासात जे दोशी आढळतील त्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवने करत आहेत.
हेही वाचा - पाय घसरून विहिरीत बुडाल्याने विद्यर्थिनीचा मृत्यू, औरंगाबादमधील घटना
हेही वाचा - शिर्डी संस्थानाच्या विश्वस्त मंडळाला औरंगाबाद खंडपीठाचा दणका